Sunday, 14 July 2019

शितू - गोपाल नीलकंठ दांडेकर

पुस्तकाचे नाव- शितू
मृण्मयी प्रकाशन(१२व्या आवृत्तीपर्यंत मौज प्रकाशन)
पाने-१६८ किंमत-१७५







       गोनीदांच्या ह्या कादंबरीबद्दल बरंच ऐकून होतो.शितू ही त्यांची मानसकण्या असं ते म्हणत.गोनिदाना भरपूर प्रसिद्धी व प्रेम मिळवून दिलेली ही कादंबरी.
       कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात घडणारी ही कथा तसं म्हणायला गेलं तर ना व्यक्तिचित्रण आहे ना प्रेमकहाणी .प्रथम आवृत्ती १९५३ सालची आहे.त्या वेळच्या रूढी, परंपरा,राहणी,जीवनमान यांचं चित्रण कादंबरीत येतं. अजाणत्या वयात बालविधवा झालेली,पांढऱ्या पायांची,घोखाई,हडळ म्हणून हेटाळली गेलेली,बापाचा निवारा लवकर गेलेली एक लहान निर्वाज्य पोर ते अप्पांच्या पंखाखाली मोठी झालेली समजूतदार,सोशिक,सुंदर शितू हा प्रवास लेखकांनी मस्त मांडलाय.कोकणातील बारीकसारीक वर्णनं आपल्याला थेट तिथे घेऊन जातात.
       शितू व अप्पांच्या मुलगा विसू यांचं भावविश्व अव्यक्त प्रेमभावना,समाज चालीरीतीमुळे आलेली बंधनं, शीतूची असहायता व घुसमट व त्यांचा शेवट गोनिदानी मस्त रेखाटलाय.वाचकांना शितू आपलीच वाटायला लागते.एक उदासीनपणा,पोकळी भरून राहते मनात.
      रावीमुकुलांचं मुखपृष्ठ खासच.दीनानाथ दलालांची पुस्तकामधली रेखाटन लाजवाब.गोनीदांच्या वाचकांनी गोनीदांच्या हृदयाच्या जवळ असलेलं हे प्रेमकाव्य एकदा जरूर वाचावं.आताच्या काळात जुने संदर्भ,चालीरीती आपल्याला पचनी पडायला कठीण जातील कदाचित पण शितू मनात घर करून राहिली नाही असं म्हणणारा विरळाच.....

       १४/७/१९
पुस्तक अभिप्रायमधली मते वैयक्तिक आहेत ...

Tuesday, 19 March 2019

आप्त -अनिल अवचट (APTA -Anil Avchat)

पुस्तकाचे नाव: आप्त -अनिल अवचट 
प्रथम आवृत्ती: १मे १९९७ 
मौज प्रकाशन ,किंमत:१६०
पृष्ठसंख्या:१६४






                 अवचटांनी वेगवेगळ्या दिवाळी अंकांमध्ये पूर्व प्रसिद्धीस आलेल्या व्यक्तिचित्रांच्या लेखांचे संकलन म्हणजे "आप्त" हे पुस्तक होय. एकूण आठ व्यक्ती वर्णनं आहेत ह्या पुस्तकात. सगळी खासंच . प्रवाही भाषेत लिहीलंय. कुठलीही अलंकारिक,अवजड भाषा नाही. प्रत्येक व्यक्तीबद्दल वाचून झाल्यावर अरेरे आपण का नाही ह्या व्यक्तीला भेटलो असं वाटत राहतं,आणि अश्या वेगवेगळ्या व्यक्ती आपल्या आयुष्यात असत्या तर काय बहार होती असाही वाटतं . 
      तीन व्यावसायिक,मिनिता सांतिझो ,जेपी ,मारुतराव सरोदे ,विनायकराव,पाटीलसाहेब दोन गुरु,क्लासो  अशी एकाहून एक सर्रास माणसं  आपल्याला ह्या पुस्तकरूपाने भेटतात व अवचट आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात. 
      घाटग्यांचा चिवडेवाला,अमेरिकेतली मिनिता ,जेपी,अवली वैज्ञानिक सरोदे अफाट वाचन व ज्ञान असलेले विनायकराव ,पाटील नावाचे कर्तव्यनिष्ठ व जबरदस्त पोलीस ,आगाशांसारखा हौशी व निष्ठेचा योग्य शिक्षक व शेवटी अवली वल्ली क्लासो ह्या सगळ्यांनी हे पुस्तक वाचनीय केलंय . 
        व्यक्तिचित्रांची आवड असलेल्यांची चुकवू नये असं पुस्तक. 

                                                          प्रशांत मयेकर 

वाचत सुटलो त्याची गोष्ट -निरंजन घाटे

 पुस्तकाचे नाव :वाचत सुटलो त्याची गोष्ट -निरंजन घाटे 
प्र आवृत्ती-२३/४/२०१७ 
समकालीन  प्रकाशन ,किंमत :३०० रु 
पृष्ठसंख्या : २४५
                          




               हि आहे एका लेखकाच्या ग्रंथवेडाची सफर . वाचनालयात जेव्हा हे पुस्तक चालून पाहिलं तेव्हा लेखकाने पानापानांवर अनेक पुस्तकांचे संदर्भ दिलेले आढळले ,त्यामुळे वाचायला घरी आणलं. 
               जगातल्या तमाम वाचनवेड्याना समर्पित असं लिहिलंय लेखकांनी.  माणूस अक्षरशः पुस्तक जगला असं म्हणावं इतपत प्रचंड वाचन त्यांनी केलंय . कुठलाही विषय व्यर्ज ना ठेवता! प्रामुख्याने इंग्रजी वाचन जास्तच. आज जवळपास १८० पुस्तकांचं लेखन केलेल्या घाटेंनी त्यांचा वाचनवृत्तान्त वाचकांसमोर मांडलाय. 
               रहस्यकथा,साहसकथा,टॅबू विषयावरची पुस्तके ,साहित्य,परमानसशास्त्र ,विज्ञानकथा व त्यासंबंधी वाचन ,महिलांसंबंधीची पुस्तकं ,शब्दकोशांचे वाचन ,चरित्र -आत्मचरित्र ,इतर कुठल्याही विषयावरचे पुस्तक असं प्रचंड वेगवेगळ्या विषयांवरचे वाचन,पुस्तके,लेखक ह्यांबद्दलची माहिती पुस्तकात येत राहते. 
                 ह्याचबरोबर पुस्तक मिळवण्यासाठी केलेली धडपड ,त्याच्या आठवणी व संदर्भ पण आपसूकच येतात . पुस्तक वाचल्यावर हौशी वाचकांना किंवा ज्यांचं वाचन अगदी नावाला आहे त्यांना आपण किती खुजे आहोत या माणसाच्या वाचनानुभवापुढे असं वाटल्याशिवाय राहत नाही..अमेरिका ,इंग्लंड व इतर पाश्चात्य देशातील शेकडो नामांकित तसेच ओळख नसलेल्या देखील लेखकांची पुस्तके लेखकाने वाचलीयेत व त्यांचे संदर्भ पुस्तकात दिलेले आहेत. वाचनाची आवड असलेल्या प्रत्येकासाठी हे पुस्तक नक्कीच वाचण्यासारखं आहे. 

प्रशांत मयेकर 
९९२०९१२६९८