पुस्तकाचे नाव- शितू
मृण्मयी प्रकाशन(१२व्या आवृत्तीपर्यंत मौज प्रकाशन)
पाने-१६८ किंमत-१७५
गोनीदांच्या ह्या कादंबरीबद्दल बरंच ऐकून होतो.शितू ही त्यांची मानसकण्या असं ते म्हणत.गोनिदाना भरपूर प्रसिद्धी व प्रेम मिळवून दिलेली ही कादंबरी.
कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात घडणारी ही कथा तसं म्हणायला गेलं तर ना व्यक्तिचित्रण आहे ना प्रेमकहाणी .प्रथम आवृत्ती १९५३ सालची आहे.त्या वेळच्या रूढी, परंपरा,राहणी,जीवनमान यांचं चित्रण कादंबरीत येतं. अजाणत्या वयात बालविधवा झालेली,पांढऱ्या पायांची,घोखाई,हडळ म्हणून हेटाळली गेलेली,बापाचा निवारा लवकर गेलेली एक लहान निर्वाज्य पोर ते अप्पांच्या पंखाखाली मोठी झालेली समजूतदार,सोशिक,सुंदर शितू हा प्रवास लेखकांनी मस्त मांडलाय.कोकणातील बारीकसारीक वर्णनं आपल्याला थेट तिथे घेऊन जातात.
शितू व अप्पांच्या मुलगा विसू यांचं भावविश्व अव्यक्त प्रेमभावना,समाज चालीरीतीमुळे आलेली बंधनं, शीतूची असहायता व घुसमट व त्यांचा शेवट गोनिदानी मस्त रेखाटलाय.वाचकांना शितू आपलीच वाटायला लागते.एक उदासीनपणा,पोकळी भरून राहते मनात.
रावीमुकुलांचं मुखपृष्ठ खासच.दीनानाथ दलालांची पुस्तकामधली रेखाटन लाजवाब.गोनीदांच्या वाचकांनी गोनीदांच्या हृदयाच्या जवळ असलेलं हे प्रेमकाव्य एकदा जरूर वाचावं.आताच्या काळात जुने संदर्भ,चालीरीती आपल्याला पचनी पडायला कठीण जातील कदाचित पण शितू मनात घर करून राहिली नाही असं म्हणणारा विरळाच.....
१४/७/१९
पुस्तक अभिप्रायमधली मते वैयक्तिक आहेत ...