Sunday, 14 July 2019

शितू - गोपाल नीलकंठ दांडेकर

पुस्तकाचे नाव- शितू
मृण्मयी प्रकाशन(१२व्या आवृत्तीपर्यंत मौज प्रकाशन)
पाने-१६८ किंमत-१७५







       गोनीदांच्या ह्या कादंबरीबद्दल बरंच ऐकून होतो.शितू ही त्यांची मानसकण्या असं ते म्हणत.गोनिदाना भरपूर प्रसिद्धी व प्रेम मिळवून दिलेली ही कादंबरी.
       कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात घडणारी ही कथा तसं म्हणायला गेलं तर ना व्यक्तिचित्रण आहे ना प्रेमकहाणी .प्रथम आवृत्ती १९५३ सालची आहे.त्या वेळच्या रूढी, परंपरा,राहणी,जीवनमान यांचं चित्रण कादंबरीत येतं. अजाणत्या वयात बालविधवा झालेली,पांढऱ्या पायांची,घोखाई,हडळ म्हणून हेटाळली गेलेली,बापाचा निवारा लवकर गेलेली एक लहान निर्वाज्य पोर ते अप्पांच्या पंखाखाली मोठी झालेली समजूतदार,सोशिक,सुंदर शितू हा प्रवास लेखकांनी मस्त मांडलाय.कोकणातील बारीकसारीक वर्णनं आपल्याला थेट तिथे घेऊन जातात.
       शितू व अप्पांच्या मुलगा विसू यांचं भावविश्व अव्यक्त प्रेमभावना,समाज चालीरीतीमुळे आलेली बंधनं, शीतूची असहायता व घुसमट व त्यांचा शेवट गोनिदानी मस्त रेखाटलाय.वाचकांना शितू आपलीच वाटायला लागते.एक उदासीनपणा,पोकळी भरून राहते मनात.
      रावीमुकुलांचं मुखपृष्ठ खासच.दीनानाथ दलालांची पुस्तकामधली रेखाटन लाजवाब.गोनीदांच्या वाचकांनी गोनीदांच्या हृदयाच्या जवळ असलेलं हे प्रेमकाव्य एकदा जरूर वाचावं.आताच्या काळात जुने संदर्भ,चालीरीती आपल्याला पचनी पडायला कठीण जातील कदाचित पण शितू मनात घर करून राहिली नाही असं म्हणणारा विरळाच.....

       १४/७/१९
पुस्तक अभिप्रायमधली मते वैयक्तिक आहेत ...

Tuesday, 19 March 2019

आप्त -अनिल अवचट (APTA -Anil Avchat)

पुस्तकाचे नाव: आप्त -अनिल अवचट 
प्रथम आवृत्ती: १मे १९९७ 
मौज प्रकाशन ,किंमत:१६०
पृष्ठसंख्या:१६४






                 अवचटांनी वेगवेगळ्या दिवाळी अंकांमध्ये पूर्व प्रसिद्धीस आलेल्या व्यक्तिचित्रांच्या लेखांचे संकलन म्हणजे "आप्त" हे पुस्तक होय. एकूण आठ व्यक्ती वर्णनं आहेत ह्या पुस्तकात. सगळी खासंच . प्रवाही भाषेत लिहीलंय. कुठलीही अलंकारिक,अवजड भाषा नाही. प्रत्येक व्यक्तीबद्दल वाचून झाल्यावर अरेरे आपण का नाही ह्या व्यक्तीला भेटलो असं वाटत राहतं,आणि अश्या वेगवेगळ्या व्यक्ती आपल्या आयुष्यात असत्या तर काय बहार होती असाही वाटतं . 
      तीन व्यावसायिक,मिनिता सांतिझो ,जेपी ,मारुतराव सरोदे ,विनायकराव,पाटीलसाहेब दोन गुरु,क्लासो  अशी एकाहून एक सर्रास माणसं  आपल्याला ह्या पुस्तकरूपाने भेटतात व अवचट आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात. 
      घाटग्यांचा चिवडेवाला,अमेरिकेतली मिनिता ,जेपी,अवली वैज्ञानिक सरोदे अफाट वाचन व ज्ञान असलेले विनायकराव ,पाटील नावाचे कर्तव्यनिष्ठ व जबरदस्त पोलीस ,आगाशांसारखा हौशी व निष्ठेचा योग्य शिक्षक व शेवटी अवली वल्ली क्लासो ह्या सगळ्यांनी हे पुस्तक वाचनीय केलंय . 
        व्यक्तिचित्रांची आवड असलेल्यांची चुकवू नये असं पुस्तक. 

                                                          प्रशांत मयेकर 

वाचत सुटलो त्याची गोष्ट -निरंजन घाटे

 पुस्तकाचे नाव :वाचत सुटलो त्याची गोष्ट -निरंजन घाटे 
प्र आवृत्ती-२३/४/२०१७ 
समकालीन  प्रकाशन ,किंमत :३०० रु 
पृष्ठसंख्या : २४५
                          




               हि आहे एका लेखकाच्या ग्रंथवेडाची सफर . वाचनालयात जेव्हा हे पुस्तक चालून पाहिलं तेव्हा लेखकाने पानापानांवर अनेक पुस्तकांचे संदर्भ दिलेले आढळले ,त्यामुळे वाचायला घरी आणलं. 
               जगातल्या तमाम वाचनवेड्याना समर्पित असं लिहिलंय लेखकांनी.  माणूस अक्षरशः पुस्तक जगला असं म्हणावं इतपत प्रचंड वाचन त्यांनी केलंय . कुठलाही विषय व्यर्ज ना ठेवता! प्रामुख्याने इंग्रजी वाचन जास्तच. आज जवळपास १८० पुस्तकांचं लेखन केलेल्या घाटेंनी त्यांचा वाचनवृत्तान्त वाचकांसमोर मांडलाय. 
               रहस्यकथा,साहसकथा,टॅबू विषयावरची पुस्तके ,साहित्य,परमानसशास्त्र ,विज्ञानकथा व त्यासंबंधी वाचन ,महिलांसंबंधीची पुस्तकं ,शब्दकोशांचे वाचन ,चरित्र -आत्मचरित्र ,इतर कुठल्याही विषयावरचे पुस्तक असं प्रचंड वेगवेगळ्या विषयांवरचे वाचन,पुस्तके,लेखक ह्यांबद्दलची माहिती पुस्तकात येत राहते. 
                 ह्याचबरोबर पुस्तक मिळवण्यासाठी केलेली धडपड ,त्याच्या आठवणी व संदर्भ पण आपसूकच येतात . पुस्तक वाचल्यावर हौशी वाचकांना किंवा ज्यांचं वाचन अगदी नावाला आहे त्यांना आपण किती खुजे आहोत या माणसाच्या वाचनानुभवापुढे असं वाटल्याशिवाय राहत नाही..अमेरिका ,इंग्लंड व इतर पाश्चात्य देशातील शेकडो नामांकित तसेच ओळख नसलेल्या देखील लेखकांची पुस्तके लेखकाने वाचलीयेत व त्यांचे संदर्भ पुस्तकात दिलेले आहेत. वाचनाची आवड असलेल्या प्रत्येकासाठी हे पुस्तक नक्कीच वाचण्यासारखं आहे. 

प्रशांत मयेकर 
९९२०९१२६९८

Wednesday, 30 March 2016

नवीन परीक्षण लवकरच

काही कारणांमुळे हा धागा बरेच दिवस काही नवीन लिखानाशिवायाच होता...तरी लवकरच नवीन पुस्तक परीक्षणं लिहायला चालू करेन…. 
   धन्यवाद 
प्रशांत पं  मयेकर 

Monday, 11 November 2013

चक्र-जयवंत दळवी (chakra -jaywant dalavi)

पुस्तकाचे नाव: चक्र
लेखक: जयवंत दळवी
म्याजेस्टिक प्रकाशन  पाने :१६७  किंमत १०० रु



  चक्र बद्दल बरच काही ऐकून होतो व शेवटी एकदाची कादंबरी हातात पडली. जयवंत दळवींची हि पहिलीच कादंबरी पण एक लेखक म्हणून ते किती भन्नाट लिहू शकतात ह्याची पुरेपूर साक्ष देणारी .
       कादंबरीचं background म्हणजे मुंबईतील एक झोपडपट्टी. पुस्तक सत्तर च्या दशकांत पूर्वार्धाला लिहिल गेलं  असल तरी अजूनही ते तितकंच वाचनीय आहे . झोपडपट्टीतील गरीब कुटुंब,त्यांची भाषा ,विचारसरणी,जगण्यासाठी करावा लागणारा आटापिटा ,बकाल पणाचे वास्तविक दर्शन अंगावर काटा आणते. आपल्यासारखा मध्यमवर्गीय पांढरपेशा माणूस अक्षरशः व्यतिथ होतो. कादंबरीत बकाल झोपडपट्टीत राहणाऱ्या बेन्वा ,त्याची आई,त्याचे मित्र ,तिथला तडीपार झालेला गुंड लुका ह्याच्या बरोबर कादंबरी पुढे जात राहते. त्याचे जीवनमान,आत्यंतिक गरिबीमुळे आलेलं अगतिक जीवन,एक वेळच्या भाकरीची भ्रांत असलेल्या रिकामटेकड्या माणसांची जगण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपड त्यांनी झोपडपट्टी वासियांच्याच भाषेत समर्थपणे उभी केली आहे .
           पराकोटीच्या गरिबीमुळे माणूस कुठल्या थराला जाऊन वागतो,त्यामुळे त्याच्या सुंदर स्वप्नांची धूळधाण  कशी होते व  नियतीचे हे दुष्ट चक्र कसे चालू राहते हेच पुस्तकात अक्षरश जिवंत केलय व पुस्तकाचं नाव सार्थ केलय. पुस्तकात शिवराळ भाषा शिवराळ न वाटता वास्तववादाकडे झुकते त्यामुळे ते आक्षेपार्ह नाही वाटत .एकुन एकदा वाचण्यासाठी पुस्तक छान आहे. पण एकदमच मस्ट रीड असं मात्र नाही .

Tuesday, 10 September 2013

vaanprashtha-ganesh devi

पुस्तकाचे नाव : वानप्रस्थ
लेखक:गणेश देवी
पद गंधा प्रकाशन ,पाने १९९
पुस्तकाच नाव वाचून वानप्रस्थाश्रमा विषयी  असे वाटून मी पुस्तक वाचायला घेतले.सुरुवात फारच शाब्दिक आहे म्हणजे वाचायला जड ,विवेचन पर लेख आहे नंतर मात्र काही काळ पुस्तक वेग पकडते.      
गणेश देवी स्वतः नावाजलेले लेखक तर आहेतच त्याशिवाय विचारवंत व समाजसेवक म्हणूनही त्यांच कार्य प्रचंड आहे. आदिवासींसाठी गुजरातेतील तेज् गड येथे संस्था उभारून त्या समाजासाठी मौलिक कार्य कार्य्ण्यात त्यांचा सिंहाचा वाट आहे. पुस्तकातील पुढील कथा त्यांचा साहित्य प्रसार केंद्रासाठी लढा,त्यातील घडामोडी ,चढ उतार यांनी भरलेल्या आहेत नंतर किक्यारीया ह्या कथेत गुजरातेतील धार्मिक दंगलीच्या वास्तवावर व त्या पार्श्व भूमीवर आदिवासिच्न्हा सहभाग ह्यावर अत्यंत तठ्स्थ व तार्किक मते मंडळी आहेत(काही अंशी जी मला अजिबात पटली नाहीत ,त्यांचा सूर BJP ,VSP ,बजरंग दल विरोधातच आहे).बकि कथा वानप्र स्था विषयी,जंगलांविषयी अशी सरमिसळ अहे. एकूण पुस्तक वाचण्याजोग असलं तरी मस्ट रीड असा काही नाहीये पण काही बाबतीत नवीन माहिती व विचारदृष्टी नक्कीच देऊन जातं.
   ह्या पुस्तकाला सहा अवार्ड्स मिळालेले आहेत त्यापैकी दुर्गा भागवत मेमोरिअल अवार्ड व महाराष्ट्र फौंडेशन अवार्ड हे देखील आहेत .एकुन पुस्तकात आदिवासींची हलाखीची परिस्थती ,त्यांच जीवनमान ,त्यांच्यापुढील संघर्ष ह्यांची जाणीव वाचकाला नक्कीच होते.

Monday, 2 September 2013

बालकांड-ह मो मराठे ( Balkand- ha mo marathe )

पुस्तकाचे नाव : बालकांड ,
लेखक : ह मो मराठे
म्याजेस्टिक प्रकाशन
पाने: ३३२

             बालकांड वाचल आणि सुन्न व्हायला झालं. एखाद्याचं आयुष्य असही असू शकत याची सर्वसामान्य माणसाला कल्पनाही करता येणार नाही असं उतार चढावानि भरलेलं आयुष्य किंबहुना त्या आयुष्याचा एक छोटा कालखंड लेखकाने ह्या पुस्तकात लिहिला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे त्यांचे आत्मचरित्र नव्हे ,कादंबरीही नव्हे त्याला ते आत्मकहाणी म्हणतात. बालकांड हि त्यांच्या बालपणीची खरीखुरी गोष्ट आहे. त्यांच्या वयाच्या सातव्या वर्षी हि कथा सुरु होते व बाराव्या वर्षी संपते असे असले तरी मराठी साहित्यातील एक अत्युत्कृष्ट अशी साहित्यकृती लेखकाने निर्माण केलेली आहे ह्यात वाद नहि.
         ह्या पुस्तकाबद्दल काही लिहिण्याच्या आधी माझ्या हातात ह.  मों.  च न लिहिलेले विषय हे छान पुस्तक आल त्यात त्यांनी ह्या पुस्तकाबद्दल फार समरसून लिहिलंय म्हणजे निर्मितीप्रक्रिया व त्यानंतरचे अनुभव वगैरे त्यामुळे त्यांच्याच शब्दात इथे वर्णन देण्याचा मला मोह आवरत नाहीये त्यापेक्षा असा म्हणेन कि चांगले शब्द सापडत नाहीयेत त्यामुळे ह्या पुस्तकाबद्दल त्यांच्याच शब्दात (पुस्तकातून)त्यांनी सांगितलेली काही माहिती मी इथे देतोय :
          माझी कथा बालकांड मध्ये आहे पण ती केवळ माझी एकट्याची नहि. माझे वडील ,आई,भाऊ ,इतर भावंड,झाडंपेडं  ,परिसर यांचीसुद्धा हि गोष्ट आहे. माझ्या बालपणीच्या गोष्टीत ह्या सर्वांची गोष्टपण गुंफली गेली आहे अनेक पात्रांची मिळून ती गोष्ट झाली आहे. एका कुटुबांच्या उध्वस्त होण्याची,हाल अपेष्टांची ,काही स्वभाव्जन्य दोषांतून निर्माण झालेल्या अनर्थ परंपरां ची आणि नियतीच्या अदृश्य अशा काळाशार सावलीचीही ती गोष्ट झाली आहे.
          हि गोष्ट पाच सहा ठिकाणी घडते क़ोकणातल्या सावंतवाडीच्या जवळचं झोळम्ब नावच खेडं, गोव्यातल सुर्ल नावच खेडं ,तिथली तेलबांध नावाची वाडी,गोव्यातल नानोडा गाव,नरसोबाची वाडी अशा ठिकाणी हि गोष्ट घडते.
         त्यांचे  वडील(ते  त्यांना काका म्हणत ) झोळम्बे गावी माडा पोफळीची बाग वसवून होते त्या जमिनीत रात्रं दिवस कष्ट करून त्यांनी ठिकाण उभ केला होतं. झाडा पेडाची लागवड केली,उत्पन्न घेतल ,उपजीविका केली .स्वभ:व विचित्र,तापट. त्यांच्या स्वभावाचं  एक चक्र असे दर दीडदोन वर्षांनी अतिउत्साही मनस्थिती तर दीडदोन वर्षांनी आत्यंतिक नैराश्य.त्याचा लेखकाच्या  व त्यांच्या कुटुंबाच्या आयुष्यावर फार परिणाम झाला. शेजाऱ्या पाजारयान्शी भांडणं ,गावकर्यांशी भांडणं,जुगार खेळण,बाई ठेवण,तीर्थयात्रा असे सगळे (परस्परविरोधी)प्रकार त्यांच्या वडिलांनी केले. 
     गावातील जमिनीच्या वादावरून त्यांनी चक्क गाव सोडून जायचा निर्णय घेतला सगळे सामान-सुमान लिलाव करून विकून टाकले . बाग अशा माणसाला विकली कि ज्याने पैसे देखील वेळेवर दिले नहित. व मोजक्या सामानानिशी व कुटुंबाला घेऊन तीर्थयात्रा करत ते सुर्ल या ठिकाणी आले. तिथे त्यांच्या आईला गंभीर व विचित्र अशा दुखण्याने घेरले .ति किंचाळू लहाली भुंकू लागली .दुखन विकोपाला जाऊन त्यातच ती हाल हाल होऊन वारली .त्याआधी त्यांची तीन चार महिन्यांची नवजात बहिण तीर्थयात्रा करतानाच वारलि.
            त्यानंतर त्यांचे वडील दोघा मुलांना घेऊन नरसोबाच्या वाडीला गेले व दारोदार माधुकरी मागून त्यांनी वर्ष काढल. त्यानंतर पुन्हा सुर्ल व तेथे दार व भिंती नसलेल्या झोपडीत (खोपीत)ते राहायला लागले.त्य काळात खायला असल तर असल नाहीतर नाही अशी स्तिथी होती. जवळ पैसे नाहीत ,कर्ज झालेलं  अशा परिस्थितीत रानातल्या कडु कंदमुळा वर गुजराण करीत त्यांनी दिवस काढले. सुर्ल्याला काही होत नाही बघून ते पुन्हा झोळम्ब्याला आले तेथे उन्हाळ्याच्या दिवसात राहण्याची काही सोय नसल्यामुळे एका मोठ्या आंब्याच्या झाडाखालीच राहू लागले.
      दरम्यानच्या काळात वडिलांच्या विक्षिप्त पणाला कंटाळून त्यांच्या मोठा भाऊ पळून जातो कालांतराने तिघे एकत्र यॆउन लेखकाची कशीबशी शाळा सुरु होते. वडिलांच्या विरोधास न जुमानता लेखकाचा मोठा भाऊ त्यांच्या मागे  उभा राहून त्यांना शिक्षण घेण्यास पाठींबा देतो अन हे कथानक संपते.
        पूर्ण पुस्तकात /कथेत लेखकाची व त्याच्या कुटुंबाची त्यांच्या वडिलांच्या स्वभावामुळे होणारी विलक्षण  ससेहोलपट व विस्कळीत आयुष्य ह्यांचे खरेखुरे रेखाटन आहे क़ुठेहि लेखकाने अतिशयोक्ती केलेली नाहि.पुस्तक वाचताना अक्षरशः डोळ्यात पाणी आल्यावाचून रहात नाही. लेखकाच्याच म्हण्याप्रमाणे धाडशी, कष्टाळू ,बेफिकीर ,भन्नाट ,थोडेसे मानसिक विकृतीचे बळी ,बेफाट पण दुर्दैवी असं वडिलांचं पात्र आहे जे पूर्ण कथेवर पसरून राहिल आहे.
अनेक वेळा आपल्याला लेखकांच्या वडिलांचा पराकोटीचा राग येतो ,लगनग्या हनुबद्दल कळवळा  येतो आपण त्यांचं आयुष्य समरसून अनुभवतो इतक उत्कट लेखन लेखकाने केलेल आहे. वर्णन करण्यापेक्षा स्वतः वाचण म्हणजे भन्नाट अनुभव आहे.पुस्तक जरूर वाचावे.
रिव्यू :
आपल्या बालवयातल्या अभावग्रस्त आयुष्याचे, वडिलांच्या विक्षिप्त, उग्र स्वभावामुळे, हुकूमशाही वृत्तीमुळे अधिकच खडतर झालेल्या जगण्याचे, स्वत:च्या व कुटुंबियांच्या पराकोटीच्या शोषणाचे कलात्मक तटस्थतेने साधलेले अतिशय संयत व मर्मग्राही चित्रण "बालकांड"मध्ये आढळते.
-- केशवराव कोठावळे पुरस्कार समितीचा अभिप्राय
'बालकांडशी तुलना करता येईल असं एखादं पुस्तक आता जागतिक साहित्यात शोधायला हवं.
-- विनय हर्डीकर