Saturday, 31 August 2013

वाफाळलेले दिवस लेखक: प्रतिक पुरी (vafalalele diwas -pratik puri)

पुस्तकाचे नाव: वाफाळलेले दिवस
लेखक: प्रतिक पुरी 
गोल्डन पेज पब्लिकेशन
पाने १५५
किंमत:१७५
प्र आ :एप्रिल १३
        प्रस्तुत पुस्तकात लेखकाने शालेय जीवनात असणाऱ्या मुलांच्या मानसिकतेचे मस्त चित्रण केलेलं आहे. मुख्यत्वे आपल्याला काय सांगायचंय ते लेखक सुरुवातीलाच प्रस्तावना असं न लिहिता भूमिका या सदरात मांडतो.
                हि भूमिका वाचली कि पुस्तकात काय असणार आहे व कशाबद्दल असणार आहे याची कल्पना येते. लेखकाच्याच शब्दात ते उत्तम प्रकारे मांडता येईल : वयात येणाऱ्या मुलांच्या जीवनात घडणाऱ्या शाररीक आणि मानसिक उलथा पालथीचा वेध "वाफाळलेले दिवस "ह्या कादंबरीत घेतला आहे. पुस्तक हे वयात येण्यासंबंधी आहे. एका आठवीत गेलेल्या मुलाच्या प्रथम पुरुषी निवेदनातून त्याच स्वत:च आणि त्याच्या मित्राचं वयात येणं दर्शवलं गेलं आहे. कादंबरीचा पौगंडावस्थेतिल नायक वयात येताना मनात व शरीरात होणारे बदल कसे स्वीकारतो ,त्यावर त्याच्या काय प्रतिक्रिया उमटतात याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
          कथेचा नायक त्याचं कुटुंब ,मित्रपरिवार -दुनियादारी माहित असलेला इरसाल मित्र नित्या, अव्या, गौरु,वर्गमैत्रिणी व निंबाळकर म्हणजे कथेची नायिका ,ह्यामधून गुंफत कथा पुढे जात राहते .त्यमधे लेखकाने पौगंडावस्थेतील  अनेक स्तिथ्यंतऱ हाताळली आहेत तीदेखील रोकठोक शब्दात.
           लेखकाच्या म्हणण्याप्रमाणे यातील भाषा  शिवराळ व अश्लील असण्याचा आरोप / आक्षेप असू शकतो पण त्यात अतिशयोक्ती मात्र नाही,कथानायक हाच कथा सांगत असल्यामुळे भरपूर प्रमाणात शिव्यांचा वापर व रावडी बोलीभाषेचा वापर होतो. हा वापर पूर्णपणे नाकारता येत नसला तरी अगदी सरसकट सर्वांच्या बाबतीत मात्र हे पचनी पडेल असे नव्हे. म्हणजे सरसकट प्रत्येक शाळकरी मुलगा हीच भाषा वापरतो असे नव्हे त्यामुळे साहजिकच कादंबरी सामान्य वाचाकांसाठी किंवा पांढरपेश्या स्वभावाच्या वाचकांसाठी तरी( विशेषतः मराठी साहित्यात इतके रोकठोक लिखाण क्वचितच आढळते असे असताना)किंचित अश्लीलतेकडेच झुकणारी आहे असे माप पडेल .तरी कादंबरी जशी ज्याच्या मनाला भिडेल /पटेल तसा त्याचा त्याने तिने स्वीकार करावा व करूही नका असं लेखकाने सांगीतलच आहे. 
        एकूण लेखन छान आहे . तरी काही वाक्ये कृत्रिम वाटतात (आपण साले साहित्यिक तर नाही ना  बनणार)तर काही वेळा काही घटना न्याचरली येत नाहीत असे वाटते. पण ते अपवादात्मक.एकुन लेखकाची प्रथम कादंबरी असूनदेखील स्तुत्य लेखन केले आहे. नजीकच्या काळात दुसरा विषय हाताळताना किंवा वाचकांनी वाचताना लेखकाची खरी कस लागेल.

Thursday, 29 August 2013

यक्षांची देणगी -जयंत नारळीकर (yakshachi denagi -jayant naralikar )

पुस्तकाचे नाव : यक्षाची देणगी   लेखक :जयंत नारळीकर  मौज प्रकाशन पाने २३७  किंमत: १५०


 जयंत नारळीकर हे नावाजलेले वैज्ञानिक व लेखकही. त्यांच्या मते विज्ञानाची माहिती आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यांचा प्रचार आवश्यक आहे अनेक माध्यमे उपलब्ध असली तरीही वैज्ञानिकांमध्ये ह्याबाबतीत उदासीनता दिसून येते. प्रस्तावनेत त्यांनी लिहिलेय कि "विज्ञानाची गोळी जर कडू लागत असेल तर त्याला साखरेचे कोटिंग म्हणजे कथेचे रुपं देणे योग्य ठरेल. विज्ञानकथा अशा उद्देशाने लिहिल्या जाव्यात असे मला वाटते व निदान मी लिहितो त्या कथा तरी ह्याच उद्देशाने लिहिलेल्या आहेत".
               पुस्तकात एकूण १२   कथा आहेत व त्या सगळ्या सुरस आहेतच व आपल्याला बरीच नवीन वैज्ञानिक माहिती देतात जी रोज ऐकुन पण आपण दुर्लक्षित करतो अशीही . अनेक कथांमधून आपल्याला नवनवीन माहिती मिळत जाते. पुस्तक नक्कीच वाचनीय आहे. हातात  घेतल्यावर खाली ठेवावे असे वाटत नाही . लेखनशैलीही छान  आहे.

Sunday, 28 April 2013

आंधळ्याच्या गायी - मेघना पेठे (andhlyachya gayee-meghna pethe)

पुस्तकाचे नाव: आंधळ्याच्या गायी                                                               
लेखिका:मेघना पेठे
राजहंस प्रकाशन
पाने: १४३
किंमत:१५०
प्र आ : जून २०००                                                                           

   पुस्तकाबद्दल बरच बर वाईट ऐकुन होतो. लेखिकेच मी वाचलेलं नतिचरामी सामान्य मराठी वाचकासाठी तरी धाडसी लेखनामध्ये मोडतं त्यानंतर लेखिकेच वाचलेल दुसरं पुस्तक. हा कथासंग्रह आहे एकूण ५ कथांचा ज्या पूर्वी दिवाळी मासिकांमधून प्रसिद्ध झालेल्या आहेत.
  प्रत्येक कथा  वेगवेगळ्या जौनरची ,वेगवेगळे विषय ,जबरदस्त लिखाण शैली (आता ह्यामध्ये लेखिकेच बिनधास्त लिहीण  पण आलच ,जे काहीना अनावश्यक वाटत तर काहीना कथेची पात्रांची गरज वाटत उदा . मग ते व्यक्तीच वर्णन असो किंवा सेक्स बद्दल लिहिलेलं असो किंवा शिव्यांचा वापर असो ) . माझ्याबद्दल बोलायच झालं तर मला ते धाडसी वाटत…जीवनाकडे बघायचा ,ते व्यक्त करायची  प्रत्येकाची  आपापली स्टाईल असते  लेखकांची तर ती युनिक असते त्यामुळे मग पुढचा कीस काढत पुस्तक /लिखाण बाजूला पडाव अस मात्र होऊ नये,असो आता पुस्तकाकडे वळतो
          पहिली कथा "एक ननैतिक बघ्या "एका प्रौढ मुलाची ज्यात त्याचा बालपण कसं हरवल, त्याच्या मनाचे हिंदोळे ,कुत्र्या बरोबरचा  त्याचा संवाद मस्त . तितकीशी नाही जमलीये पण एकूण ठीक .
  दुसरी कथा -आये कुछ अभ्र हि तारुण्य उलटून जाणारया  तरीही लग्न न जमत असलेल्या तरुणीची गोष्ट. त्यात तिच्या कदाचित होणारया  नवरयाबरोबर तिची भेट,तिचे अनुभव ,हिजड्या बरोबरचा  प्रसंग ,तिची मनोवस्था ,मस्त लिहिलेय.
बाकी कथा अठरावा उंट ,सादोहरा व "आस्था आणि गवारीची भाजी" पण छान आहेत .शेवटची कथा मस्त जमलीये. धड एक कशावर पाय नसलेला ,प्रौढ साक्षरता अभियाणात  गर्क असलेला,स्वताच्याच आयुष्यात रमणारा ,मौजमजा करणारा नवरा,तात्विक चर्चेत अग्रेसर ----, कामामुळे  गांजून  गेलेली,नवर्याची  अपेक्षित साथ न लाभणारी  ,संसाराचा गाडा  चालवणारी ,मानसिक कोंडमारा झालेली त्याची बायको,------,स्वताः च्या टर्म्स वर आयुष्य जगणारी ,नवर्याबरोबर पूर्वी  लिव इन असणारी,कॅपेबल व इण्डिपेण्डनट अशी त्याची प्रेयसी    ह्या सगळ्याची कथा म्हणजे आस्था आणि गवारीची भाजी .पुस्तक एकूण ठीक आहे . म्हनजे एकदातरी जरूर वाचावे असे. काहीजणांना त्यातील भाषेवर आक्षेप असेल तरी लेखिकेची ताकत आपण बाजूला सारू शकत नाही . लेखिकेची मागे सांगितल्याप्रमाणे प्रसंग सांगण्याची शैली,कथा सादर करण्यची शैली,लेखनाची हातोटी निर्विवाद आहे.

मल पृष्ठावरील वाक्य:
"घटना घडतात. पुरातल्या ओंडक्यासारखी माणसं त्यात वाहून जातात. घडायचं ते घडून जातं... पण तरीही पर्याय असतातच ठाकलेले... तडफडण्याचे... हसण्याचे... रडण्याचे... हरण्याचे... जिंकण्याचे... क्षमेचे... सूडाचे... स्वीकृतीचे... तुकण्याचे... साक्षित्वाचे... त्यातला एकच निवडता येणार असतो आणि निवडावा तर लागणारच असतो! पर्यवसान ठाऊक नसताना अंधारात घ्यावी लागणारी उडी... माणसाच्या आयुष्यात नियत आहे ते हे. यालाच आपण स्वातंत्र्य म्हणतो!
जाणिवेचा लख्ख उजेड नाही आणि नेणिवेचा गच्च अंधार नाही, अशा तिन्हीसांजेला, अंधुक प्रकाशातल्या जुलमी रानात सोडाव्या लागणा-या या आंधळ्याच्या गायी... त्यांना म्हणे देव राखतो...!  आणि आंधळा? तो तर फक्त या भोळ्या विश्वासाची बासरी वाजवत रहातो"

पुस्तक श्राव्य स्वरुपात देखील उपलब्ध आहे:
http://www.maanbindu.com/new-marathi-audio-book-Aandhalyachya-Gayi

( ३.५ /५ )
प्रशांत मयेकर  २८/४/१३ १५: ५०

"हा महाराष्ट्र-पुरुष अति प्राचिन आहे. कधी दक्षिणापथ, दक्षिणखंड, 'म्हराष्ट्र' देश, दंडकारण्य अशा अनेक नावांनी व साजांनी ओळखला जाणारा.
अशा या वॄद्ध महाराष्ट्र-पुरुषाचे हे अस्फुट स्तोत्र आहे, हे रचण्यांतला हेतु काय ?
एवढाच की तो महाराष्ट्र-पुरुष दॄष्टीसमोर उभा ठाकावा, त्याचं झांवळें झांवळें दर्शन घडावं, परिचितांना पुनर्प्रत्ययाच्या लाभ व्हावा, जाणत्यांना खुण पटावी, अबोधांना बोध व्हावा व त्यांचे बाहु फुरफुरावेत.
आम्ही महाराष्ट्रिक कसें ? आमचे वैभव काय ? आमची महत्ता कशी ? आमचे गुण-दोष काय ? ह्या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळावीत हाच या स्तोत्र-रचनेचा हेतु आहे.
महाराष्ट्राचा प्रत्येक धोंडा एकेका रोमहर्षक प्रसंगाचा साक्षी. त्याला जर कधी काळीं जिभा फुटल्या तर तो जे जे सांगेन ते ऐकुन प्रेते उठतील, कबंधे जिवंत होतील, षंढांच्याही अंगी वारे भरेल !
स्वातंत्रप्रियता ही तर महाराष्ट्राची अंगिक प्रवृत्ती.
इंग्रजांना संपुर्ण भारत जिंकण्यापुर्वी शेवटची लढाई इथल्याच ठेंगण्या, काळसर मावळ्यांशी खेळावी लागली. ती युद्धश्री, ती रग, तो आवेश अजुनही मावळला नाही, कधी मावळेल असे दिसतही नाही. हा गुण डोंगरावरुन वहात येणार्‍या भन्नाट वार्‍याचा आहे. कृष्णा, कोयना, पवना, भीमेच्या पाण्याचा आहे.
महाराष्ट्र श्रीमंत आहे, स्वाभिमानी तर आहेच आहे, कणखर आहे, चिवट आहे. मोडेल पण वाकणार नाही, मित्रांसाठी जीव देणारा आहे, भक्तिभावाने गहिवरणारा आहे, लढताना प्राण तळहाताशी घेणारा आहे, थोडासा भांडखोरही आहे आन थोडीशी हिरवटपणाची झाकही आहे. पण किती ? अहो चंद्रावरल्या डागाएवढी हो !
ज्याने महाराष्ट्रावर लोभ केला त्याच्या पायतळी आपला जीव अंथरण्यापुरता भोळा हा महाराष्ट्र आहे, आतिथ्यशील आहे.
किंअभुना तो आहे त्या गिरिशिखरावरील दैवतासारखा, शंभुमहादेवासारखा !
संतापला तर तिभुवने पेटवील आणि संतुष्ट झाला तर कारुण्याची गंगा वाहवील ...
त्या महाराष्ट्राचे हे दर्शन ... !!! "

Tuesday, 9 April 2013

धार्मिक-अनिल अवचट (dharmik-anil avchat)

पुस्तकाचे नाव:धार्मिक     लेखक:अनिल अवचट      म्याजेस्टिक प्रकाशन  पाने :१६९     किंमत:१००
Dharmik :धार्मिक

पुस्तकाच्या मलपृष्ठावरील वाक्य:
*श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक असतो का ?
काही मानवी मुल्यांवर अनिल अवचट यांची श्रद्धा आहे
जी श्रद्धा माणसाला व्यापक बनवते ,धर्म जात,देश यांपलिकडे जाऊन माणसाकडे माणूस म्हणून पाहायला शिकवते,एवढेच काय निसर्गातल्या प्राणी ,वनस्पती यासारख्या सर्व घटकांशी जुळवून घ्यायला शिकवते ती आवश्यक श्रद्धा आणि याउलट जी माणसाला संकुचित बनवते ती घातक श्रद्धा किंवा अंधश्रद्धा .
 भारतीय समाजातील हिंदू,मुस्लिम,ख्रिश्चन धर्मीयांमधील अंधश्रद्धांचा मागोवा घेणारे हे पुस्तक *
 पुस्तकात एकूण सहा कथा आहेत त्यामधून  माणसं ,स्थळ ,श्रद्धा अंधश्रद्धा यांच्या माध्यमातून लेखकाने भाष्य केल आहे .बुवबाई  हा निर्मलामाताजी वरचा लेख,शेखसल्ल्याचा उरूस हा पुण्यातील दर्ग्यात होणार्या उरुसाबाद्दलचा लेख त्यानंतर येणारा देवदादासिंवरचा लेख जो बराच  मोठा व माहितीपूर्ण आहे .त्यानंतर  आहे झपाटलेलं गाणगापूर ,बुवा वाघमारे,व इतस्थता.सर्व लिखाण फार अभ्यासपूर्वक निरीक्षण करून केलेल आहे.प्रत्येक  वेळा लेखक स्वतः त्या त्या व्यक्तींना,त्या घटनेशी संबधित लोकांना,त्या त्या जागाना भेट देऊन आले आहेत  व मगच आपले मत मांडलेले आहे.धार्मिक पुस्तकात लेखक प्रत्यक्ष अशी टीका करीत नाहीत पण सत्य काय ?लोकमत काय?खरी परीस्तिथी  काय ?ह्यावर ते तटस्थपणे भाष्य करतात .समाजातिल इतर भ्रामक समजुती कशा व समाज वेळोवेळी त्यांना कसा बळी पडतो हे पुराव्यानिशी लिहितात व ते बहुतांशी पटते देखील. सर्व लेख वाचून अस्वस्थ व्हायला होतं . हे अस आपल्या समजात घडतं?घडलंय ?यावर विश्वास बसत नाही .
 लेखकाच्या मते धर्म हा अवडंबर माजवूनही व्यक्त करता येतो आणि लोकोपयोगी कार्यातूनही व्यक्त करता येतो निवड आपण करायची आहे. हा असला नको त्या श्रद्धा किंवा अंधश्रद्धा नसलेला समाज एके काळी अस्तित्वात येईल अशी लेखकाला खात्री  आहे म्हणूनच त्यांच हे लेखनप्रयोजन.पुस्तक म्हणूनच जरूर वाचावे . 

Monday, 25 March 2013

शुभ्र काही जीवघेणे-अंबरीश मिश्र (shubra kahi jeevghene-ambarish mishr)

पुस्तकाचे   नाव: शुभ्र काही जीवघेणे       लेखक:अंबरीश मिश्र      राजहंस प्रकाशन    पाने:१५७       किंमत:१४०
 
                     पुस्तकाच्या मलपृष्ठावरील लिहिलेला संदर्भ अतिशय समर्पक शब्दात पुस्तकाबद्दल मत मांडतो.त्यात लेखक म्हणतो: कलेचा प्रवास धुंद करणारा असतो .यश,कीर्ती,मान -सन्मान हि या प्रवासातील रमणीय विश्राम् स्थळे असतील.परंतु प्रतिभेचा धूप जाळणारे मनस्वी कलावंत जीवनार्थाच मंथन करण्यातच  मग्न असतात "शुभ्र काही जीवघेणे" शोधत असतात.आपल्या प्रासादिक कलागुणांनी साहित्य,नाट्य,संगीत अन सिनेमाचा परिसर उजळून काढणारी सात कलंदर व्यक्तिमत्व या पुस्तकाला रेलून उभी आहेत.
         सात मनस्वी कलाकारांच्या जीवन कहाण्या आणि त्यांच्या प्रतिभा प्रवासाचा वृत्तांत या पुस्तकात चिरेबंद आहे .यातले शुभ्र काही जीवघेणे जे जे आहे ते या कलावंतांचे आहे,जे नकोसे वाटेल त्याला मी कारणीभूत आहे असं लेखक नम्रतापूर्वक लिहितो.
    चन्द्रदेवतेच गाणं हा शोभा गुर्टू वरील लेख आहे,अख्तरीबाई हा बेगम अख्तर यांच्या वरील लेख,चंद्रग्रहण हा सादत हसन मंटो  वरील लेख,ओ पी नय्यर ,पार्श्व नाथ आळतेकर ,
,सज्जाद  हुसैन,पंकज मलिक  हि इतर मंडळी.पुस्तकात प्रत्येकाची छान माहिती लेखकाने दिलीये.पुस्तक मस्त आहे . मुळता  सगळे लेख दिवाळी अंकामधून प्रसिद्ध झालेले आहेत व नंतर पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेले आहेत.पुस्तकामुळे  अनेक चांगल्या गुणी कलावंतांची,त्यांच्या आयुष्याची  आपल्याला ओळख होते.

Thursday, 21 March 2013

मुंबईचे वर्णन --गोविंद नारायण माडगावकर (mumbaiche varnan-govind narayan madgaonkar)

पुस्तकाचे नाव:मुंबईचे वर्णन          गोविंद नारायण माडगावकर      समन्वय प्रकाशन                             पाने ३६०        किंमत:३५०

                            हे पुस्तक प्रथम १८६३ मध्ये प्रसिद्ध झाले .त्यानंतर जवळ जवळ १०० वर्षे ते दुर्लक्षित राहिले त्यानंतर २००१ साली ते पुनर्मुद्रित करण्यात आलेले आहे.न रा फाटकांनी प्रस्तावनेत लिहिलेय कि १८६३ मध्ये मुंबईची जी स्तिथी होती तिचे समग्र व सम्यक  दर्शन पुढच्या पिढीला घडावे अशी माडगावंकरांची आकांक्षा ह्या पुस्तकात सफल झालेली आहे.त्यांचे पुस्तकात तेव्हाच्या नागरिक जीवनाची बहुतेक सर्व अंगोपांगे आलेली आहेत.मुंबई ह्या नामांकित व वैभवाच्या शिखरावर चढलेल्या शहराचा साध्यंत वृतांत त्यांनी ह्या पुस्तकात  लिहिला आहे.
पुस्तकात एकूण १५ प्रकरणे  आहेत.त्यामध्ये  मग शहराची रचना,भाषा ,नामांकित स्थळे ,इंग्रजांची राजसत्ता ,मुळच्या स्थायिक लोकांची   माहिती,देवालायांची माहिती,रोगराई व तिची कारणे ,त्यावेळची शहराची रचना व माहिती (भायखळे ,माजगाव ,आर्थर बंदर,पोलोबंदर ,वाडिया बन्दर ,वरळी ,म्हातार पाखाडी,वालुकेश्वर ),आरमार,लष्कराची माहिती,लोकसंख्या,दुष्काळ व त्याचे निवारण,पारशी ,मुसलमान लोकांचे दंगे व त्यांचे निराकरण ,शहराचे उत्पन्न,नवे कर व त्यांची करणे,कोर्ट व न्यायव्यवस्था ,दवाखाने,पुस्तकालये,वेगवेगळे कारखाने व उद्योग धंद्यांची माहिती ई. काय काय लिहीलीले आहे.एकुणात त्यावेळच्या एकूण समाजव्यवस्थेच प्रतिबिंब त्यांच्या लेखनातून दिसून येतं .इंग्रजांची व्यवहार कुशलता,राज्य करण्याची पद्धती ह्यावर लेखकाने खूपच positively लिहिलेले आहे. ते लेखनासाठी त्यावेळच्या उपलब्ध साधनाचा,बखरीचा  व स्वताच्या सुक्ष्म अवलोकनाचा वापर त्यांनी केलाय.छोटे मोठे किस्से ,वर्णने सांगून त्यावेळचे चित्रच डोळ्यासमोर उभे केलेले आहे .जुन्या मुंबईचा अभ्यास करताना हे पुस्तक म्हणजे मैलाचा दगडच आहे असे जरूर सांगावेसे वाटते.वेळोवेळी दाखले म्हणून उदाहरणे,बखरीतील उतारे,जुन्या जाणत्यांची मते,श्लोक,अभंग,कवने,लोकाच्या त्यावेळच्या खोट्या भ्रामक समजुती ई सारे पानोपानी दिलेले आहे.
     पुस्तक नक्कीच वाचण्यासारखे आहे.बरीच माहिती जी आपणाला किवा आपल्या वाड  वडिलांना देखील माहिती नाही ती यायोगे आपल्याला वाचायला मिळते.पुस्तकातील काही वाक्ये येथे देत आहे तेणेकरून वाचकांना अंधुकशी कल्पना येईल कि पुस्तकात काय आहे ते.
माहीम आणि मुंबई वेगवेगळी बेटे होती
मुंबईची चार पाच सुट्टी बेटे होती-कुलाबा,महालक्ष्मी,वरळी,माजगाव,शिव

महालक्ष्मीस जाण्यास पूर्वी होडी लागत असे ती आजच्या कामाठीपुरातून जात असे

मुंबईत पूर्वी लुटारू लोकांचे भय असल्यामुळे जेव्हा इंग्रज प्रथम इथे आले तेव्हे त्यांनी रात्रीचे आठ वाजले म्हणजे तोफ मारावी आणि लोकास बाहेर न पडण्याची इशारत करावी आणि पहाटेच्या पाच कळकाच्या घंटा  वाजल्या आणि अरुणोदय झाला कि फिरून तोफ मारून लोकांस बाहेर फिरायची मोकळीक आहे अशी सूचना द्यावी अशी वहिवाट घातली होती.

त्यावेळी शेतास व माडास  मासळीचे खत घालीत त्यामुळे शेतातून व बागातून दुर्गंधी सुटे व लोकास उपद्रव होई १७२० मध्ये सरकारने त्यास मनाई केली.

१६९९ मधील एका पत्रात गवर्नर लिहितो,एथील लोक पादचारी आहेत,बसाय्जोगा मुंबईत एकच घोडा असून गाडीस जुम्पायाजोगी बैलांची एक जोडी आहे .

कुलाबा हे मुंबईच्या दक्षिणेच्या शेवटास लहानसे ओसाड बेत असून ढोरे चरण्याचे ठिकाण होते.

शिवचा पूल १७९७त बांधला त्यास ५०५७५ रुपये खर्च झाला हे द्रव्य रयतेकडून उत्पन्न करून घेण्यासाठी अशी युक्ती काढली कि या पुलावरून गाड्या घोडे पालक्या जातील येतील त्यांजकडून याप्रमाणे कर घ्यावा --बैलाच्या गाडीस अर्धा आणा,घोड्यास चार आणे,एका घोड्याच्या गाडीस अर्धा रुपया ,आणि दोन घोड्यांच्या गाडीस एक रुपया याप्रमाणे कर द्यावा .कालांतराने जे द्रव्य हा पूल बांधावयास खर्च पडले ते भरपाई होऊन चुकले तेव्हा लागलेच कर घेणे बंद झाले.

लोहार लोकांचे कारखाने व लोखंडी समान विक्नार्यान्ही दुकाने आहेत म्हणून त्याला लोहार चाळ म्हणतात 

कोणास मोठे शासन करायांचे असल्यास शहरांत दवंडी पिटवून त्यास तरीपार करीत म्हणजे त्याला पनवेल ,अलिबाग,उरण एथे नेउन सोडीत आणि त्याला शहरात येण्याचा प्रतिबंध करीत.हे त्यावेळचे काळेपाणी!