Friday, 8 March 2013

रात्र काळी... घागर काळी--चिं त्र्यं खानोलकर (ratara kali ghagar kali -c t khanolkar)

पुस्तकाचे नाव: रात्र काळी... घागर काळी             लेखक: चिं त्र्यं खानोलकर      मौज प्रकाशन      पाने २०३
                         

                   पुस्तकाबद्दल, लेखकाबद्दल बरच ऐकून होतो शेवटी एकदाचे रात्र काळी हाती लागले.एका बैठकीत मात्र नाही संपवता आले.त्यातील लिखाण,भाषा,कथा,पात्र सगळ अंगावर आलं.एखादा मानुस  एवढ दुखी जीवन कसा रेखाटू शकतो ह्यावर विश्वास नाही बसत.लेखन भयकथा नसले  तरी गुढतेकडे वळणारे आहे.नाही नाही हि गुढकथा नाही पण चिं त्र्यं च्या लेखनात असा काही  बाज आहे कि त्या अंधाऱ्या काळोखात आपल्याला सोडून देतात आणि आपण भटकत बसतो त्यातील पात्रांबरोबर त्यांची सूख दुःखं झेलत! भाषा शैली तर इतकी वेगळी कि प्रतीकात्मकता अशी पण असू शकते ह्यावर आपण दिग्मूढ होऊन  जातो .  
              अलौकिक सौंदर्य लाभलेली यज्ञेश्वर बाबाची कन्या लक्षी हि कथेची मुळ. नायिका नाही म्हणू शकत पण तिच्याभोवती कथा फिरत राहते.मंदिरात खड्या आवाजात रौद्र म्हणणाऱ्या दिगम्बराच्या आवाजावर भाळुन यज्ञेश्वर बाबा लक्ष्मी चे लग्न दिगंबर बरोबर करायचे ठरवतात व त्याच्या बापाला दास्याला तसे सांगतात.काहीही ध्यानीमनी नसताना केवळ वडिलांच्या सांगण्यावरून लक्ष्मी दिगम्बराशी  लग्न करते.पण दिगंबर म्हणजे मानसिकदृष्ट्या दुर्बल निघतो.असामान्य असं सौंदर्य सहज प्राप्त्य झालेलं असतानादेखील तो ते सहन करू शकत नाही.ते सौंदर्य त्याला पेलत नाही.लग्नाच्या पहिल्या क्षणापासुन त्या सौंदर्याचा त्याच्यावर इतका विलक्षण पगडा बसतो कि तिच्या सौंदर्या चीच त्याला भीती वाटू लागते  ते सौंदर्य निर्मळ  नाहीच ,एवढी सुंदर  स्त्री पवित्र असूच शकत नाही असे तो मनाने घेतो.पवित्र लक्ष्मीवर संशय घेतो तेव्हा लक्ष्मी तुटून पडते. नववधू म्हणून बाळगलेल्या सगळ्या अपेक्षा मातीमोल होतात.दिग्या एका क्षणी लक्ष्मीवर बलात्कार करतो व भ्रमिष्टासारखा निघून जातो.तीच आणि तेवढीच तिला लाभलेली पुरुषाची संगत. दिगंबर मग जाईकडे जातो पण तिथेदेखील तो टिकू शकत नाही.जाई हि भाविनीची मुलगी पण दिगम्बरवर जीवापाड प्रेम करणारी.पण दुर्बल मनोवृत्तीमुळे दिगंबर दूर निघून जातो .जाताना जेव्हा लक्ष्मी पोटुशी असते तेवा ते मुल आपल नव्हे ते पाप आहे असे तो दास्याला सांगतो.
      दास्या हा दुर्बल मनोवृत्तीचा कहर दाखवलेला आहे त्याला स्वतःला काही निर्णय घेत येत नाहीत त्यासाठी त्याला अच्युत ची मदत लागते.अच्युत हा त्याचा जिवाभावाचा मित्र.लक्ष्मीचं सौंदर्य सगळ्यांना तिच्याकडे आकर्षित करते ह्यातून दास्याही सुटू शकत नाही अन अच्युतही.दास्याच्या लक्ष्मीच्या साडीकडे पाहत राहण्याचा आणि ती हातात घेण्याचा प्रसंग खानोलकरांनी जबरदस्त लिहिलाय.अशा परिस्थितीत लक्ष्मी एकटी पडते व खिडकीतून पाहण्र्या केमळेकर वकिलांच्या घरात आश्रयाला जाते.पण तिथेदेखील तिच्या पदरी एकटच राहाण येत.केमळेकराना पण ते सौंदर्य झेपत नाही.केवळ पाहण्यापलीकडे ते काही करू शकत नाहीत .ते तिच्यासाठी दास्याच्या घरासमोर तिला घर बांधून देतात पण सहज साध्य  असताना देखील लक्ष्मीच्या दैवी सौंदर्याला स्पर्श करायला ते धजावत नाहीत.केमळेकरांच्या  सांगण्यावरून लक्ष्मीला वाणसामान पुरवणारा दाजी देखील तिच्याकडे आकर्षित होतो पण तोदेखील तिच्या शापित सौंदर्याला स्पर्श करण्याचे धाडस दाखवत नाही.लक्ष्मी सर्वस्व अर्पण करायला तयार असूनही दाजी लटका पडतो.ते अनिवार सौंदर्य त्याला विजेसारखा वाटत ते सहन करण्याची त्याची ताकद नसते तो वर्षानु वर्ष लक्ष्मीकडे येतो  व बसून निघून जातो.
                             लक्ष्मीचं पात्र म्हणजे विलक्षण गुंतागुंत आहे. तरुणी,नववधु,कुठलाच भावनिक आधार नसलेली पोटुशी स्त्री,शरीर सुखापासून वंचित राहिलेली स्त्री ,एवढ्या सगळ्यात ती व्यभिचारी आहे असा तिच्यावर लागलेला ठपका हे सगळा भोगत असलेल शापित अलौकिक सौंदर्य असलेल कोवळ तरुण शरीर.केवळ अशक्य आहे  हि कथा वाचण  म्हणजे. तिच्या मानसिक हिंदोळ्यांवर आपण स्वार होऊन तिच्या दुखात सामील होतो.त्यातून प्रत्येक वेळी निर्मल असूनदेखील चवचाल म्हणूनच तिची गावभर चर्चा होते ते दुखः तर ती कुणालाही सांगू शकत नाही तिचा स्वतःचा मुलगा देखील तिची हेटाळणी करतो.ह्या सगळ्यात मध्ये अनेक पात्र आली आहेत.
दास्याचा लक्ष्मीच्या सौंदर्यावर
वेडा झालेला वामन ,दाजी ची मुलगी सुमन,लक्ष्मी चा मुलगा सदा,नदीकाठी सापडलेली बेवारस बकुळ  ह्यांना घेऊन कथा पुढे सरकत राहते.कथा प्रत्यक्ष  वाचायलाच हवी तरच चिं त्र्यं च्या लेखनाची जादू अनुभवता  येईल.कादंबरी थोडी अपूर्ण वाटते.काही पात्रे अचानक समोर येतात.मला तितकीशी नाही आवडली.दुखी शेवट असल्यामुळे असेल कदाचित पण नाही ते एकच कारण नाही.दुखः सारी कथा व्यापून राहत ते काही कुठल्या एका भागासाठी नाही येत.कादंबरी वाचताना आपण सुन्न होऊन जातो.तितकीशी न आवडण्याचं कारण हे देखील असेल कि एखाद सौंदर्य एवढं अलौकिक असू शकत कि ते अप्राप्य वाटावं ??मला नाही पटत.एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत शक्य आहे पण कथेत येणार प्रत्येक पुरुष लक्ष्मीच्या सौंदर्याच्या तेजाने झाकोळला जावा व तिला स्पर्श देखील न करता (जेव्हा  कि ती साध्य आहे तेव्हा) तिचीच साधना करीत राहावा हे अशक्य वाटते .लक्ष्मी अशी रंगवली आहे कि कधी ती नायिका होते  कधी खलनायिका, कधी दैवी वाटते तर कधी शापित ,कधी प्रेमळ वाटते तर कधी कपटी तिची अनेकविध रूपे लेखकांनी लीलया रंगवली आहेत.
 कादंबरी एकदा तरी वाचावी.एकदा वाचून समजतही  नाही आणि झेपतही नाही इतका तिचा आवाका प्रचंड आहे.
विष्णुदास नाम्याच्या गवळणी वरून कादंबरीचे नाव घेतले असले तरी लेखकांनी लेखणीने काळोख भरून टाकलाय अक्ख्या पुस्तकात.त्यासाठी लेखकाला,त्याच्या  शैलीला  सलाम.
गवळण :  रात्र काळी ,घागर काळी,यमुना जळे ती काळी हो माय !
                 बुंथ काळी,बिलवर काळे ,गळामोती ऐकावळी  काळी हो माय

1 comment:

  1. http://www.mimarathi.net/node/8305 ---- in this link mr vishal kulkarni has written very nice review ...some nice discussions and infonmations also on this page too

    ReplyDelete