Thursday, 21 March 2013

आजची बदलती चाळीशी--डॉ लिली जोशी (aajachi badalati chalishi-dr lili joshi)

पुस्तकाचे नाव:आजची बदलती चाळीशी    लेखिका :डॉ लिली जोशी       पद्मगंधा  प्रकाशन   पाने :२६०   किंमत:१५०
      
"आजची बदलती चाळीशी "हा लेख नोव्हेंबर १९९७ साली प्रथम साप्ताहिक सकाळ मध्ये प्रसिद्ध झाला .अनेक वाचकांनी या विषयावर पुस्तक लिहावे असे सुचवले.
  त्यांच्याकडे उपचारासाठी येणारे रुग्ण आणि अन्य परिचित यांच्याकडून त्यांनी एक समग्र प्रश्नावली भरून घेतली.त्यानुसार काही आखाडे ,अंदाज ,अनुमान आणि निष्कर्ष काढले .यामधून प्रस्तुत पुस्तक साकार झाले आहे.
    डॉ लिली  जोशी यांनी चाळीशी आणि नंतरच्या एकूणच जीवनप्रणाली विषयी त्याचप्रमाणे आहारशास्त्र ,व्यायामशास्त्र ,कामजीवन ,मृत्यू संकल्पना आणि अर्थकारण यांचाही विचार ह्या पुस्तकात केला आहे.चाळीशी हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे.त्यानंतर आयुष्यात एक वेगळे वळण घ्यायचे असते ते कसे?हे समजावून घेण्यासाठी प्रस्तुत पुस्तक मार्गदर्शन करेल.
गेस्ट आर्टिकल  by :पंकज व. महाजन. २०/३/१३

Friday, 15 March 2013

दुर्गदर्शन-- गो नी दांडेकर(durgadarshan go ni dandekar )

पुस्तकाचे नाव: दुर्गदर्शन              लेखक: गो नी दांडेकर           मृण्मयी प्रकाशन               पाने:१८४


दुर्गदर्शन हे गो नि दांच दुर्गभ्रमंती च्या निमित्ताने केलेलं ललीतम्य लेखन .दुर्गांवर त्याचं निरतिशय प्रेम होतं.दुर्गभ्रमण करताना इतिहासाचे साक्षीदार असणारे दुर्ग त्यांच्या मनात इतिहास काळातलं विश्व उभ करीत.तिथले भग्नावशेष         गोनिदांशी बोलू लागत .दुर्गांवरच्या निसर्गाचे अनेकानेक विभ्रम त्यांना मोहवित अन त्यांच भावविश्व संपन्न होई त्यातूनच हे लेखन झालं .दुर्गावर जाणारया अन न जाणाऱ्या असंख्यांना दुर्गांकडे पहायची नवी दृष्टी दिली ---प्रस्तावनेत वीणा ,विजय देव
कुणास काय आवडते कुणास काय?तर मग मला जर किल्ले पाहत भटकणे आवडले ,तर त्याबद्दल कुणाच्या मनी खंत उपजू नये .किंबहुना किल्ले पाहणे,चान्दिण्यानी भरल्या त्यांच्यावरल्या रात्री स्वच्छदाने भोगणे,हे मला जडलेले व्यसन आहे.
   प्रस्तावनेत गो नि दानी  हे देखील लिहिलेय कि दुर्गदर्शन हे लहानगे पुस्तक मी केलेल्या दुर्ग भ्रमनातील काही दिवसांची दैनंदिनी आहे .या दैनंदिनीत अमुक किल्ला अमुक गावापासून इतके मैल ,अशी तपशील सांगणारी माहिती नोंदवलेली नाही.एका मनस्वी परीभ्रामकाच्या मनावर उठलेली प्रतिबिंबे या पुस्तकात आढळतील .मी आणि माझ्या मित्रांनी उन्हापावसाचे घाव कसे सोसले,याच्या क्वचित कधी केलेल्या नोंदी यात सापडतील.
   काही थोडे अदभुत जगता यावे काही थोडे साहस .एखादा कडा -फार मोठा नको -चढता यावा .एखाद्या अवघड वाटेने उतरता यावे.कुठे खरचटावे .कुठे ठेच लागावी.कुठे पाय मुरगळावा .कुठे घामाघूम व्हावे .कधी कडाडून तहान लागावी.कधी अपरंपार भूक लागावी.कुठे टळटळीत उन्हात भटकायला मिळावे. भणाभणा   वर अंगावर घेता  यावा .कधी काकडत्या थंडीत राने  पार करावी लागावीत.असे थोडे बेबंद जीवन.थोडे धोकेबाज.म्हणजे मग जगणे सुगंधी होते,त्याला एक निर्भयपण लागते.--दुर्गदर्शन
घरचे भाडे दहा रुपये महिना देतो .भिंतीना चिरा  पडल्या आहेत.कुटुंब सारखे ओरडत असते तेल संपले,गहू आणायला हवेत,तुमची धोतरे   फाटली.माझ्या कानी  आक्रोशच शिरत नाही.हि धरीत्रीमोलाची दोन लेणी माझ्या घरी आहेत.आता माझ्या एवढा येशवंत आणि धनवंत मला दुसरा कुणी दिसतच नाही  ---पाचाडला तुकनाना शेड्ग्यांकडे मिळालेली जिजाउंच्या देवघरातील व्यन्कटेशाची मूर्ती व शिवाजी महाराजांच्या पावलाचे ठसे घेतले त्या कथेच्या शेवटी गो नि दांचे उद्गार .
    पुस्तकात खूप छान छान वर्णनं   वाचायला  मिळतात मग ते दहा दिवसात दहा दुर्ग असो कि भर उन्हात सिद्धगड चढण्याची गोष्ट ,हरिश्चंद्रगड ,पन्हाळा ते खेळना.सगळ्या कथा रोमहर्षक आहेत. खऱ्या सह्यप्रेमीने वाचल्याच पाहिजेत.

Friday, 8 March 2013

रात्र काळी... घागर काळी--चिं त्र्यं खानोलकर (ratara kali ghagar kali -c t khanolkar)

पुस्तकाचे नाव: रात्र काळी... घागर काळी             लेखक: चिं त्र्यं खानोलकर      मौज प्रकाशन      पाने २०३
                         

                   पुस्तकाबद्दल, लेखकाबद्दल बरच ऐकून होतो व शेवटी एकदाचे रात्र काळी हाती लागले.एका बैठकीत मात्र नाही संपवता आले.त्यातील लिखाण,भाषा,कथा,पात्र सगळ अंगावर आलं.एखादा मानुस  एवढ दुखी जीवन कसा रेखाटू शकतो ह्यावर विश्वास नाही बसत.लेखन भयकथा नसले  तरी गुढतेकडे वळणारे आहे.नाही नाही हि गुढकथा नाही पण चिं त्र्यं च्या लेखनात असा काही  बाज आहे कि त्या अंधाऱ्या काळोखात आपल्याला सोडून देतात आणि आपण भटकत बसतो त्यातील पात्रांबरोबर त्यांची सूख दुःखं झेलत! भाषा शैली तर इतकी वेगळी कि प्रतीकात्मकता अशी पण असू शकते ह्यावर आपण दिग्मूढ होऊन  जातो .  
              अलौकिक सौंदर्य लाभलेली यज्ञेश्वर बाबाची कन्या लक्षी हि कथेची मुळ. नायिका नाही म्हणू शकत पण तिच्याभोवती कथा फिरत राहते.मंदिरात खड्या आवाजात रौद्र म्हणणाऱ्या दिगम्बराच्या आवाजावर भाळुन यज्ञेश्वर बाबा लक्ष्मी चे लग्न दिगंबर बरोबर करायचे ठरवतात व त्याच्या बापाला दास्याला तसे सांगतात.काहीही ध्यानीमनी नसताना केवळ वडिलांच्या सांगण्यावरून लक्ष्मी दिगम्बराशी  लग्न करते.पण दिगंबर म्हणजे मानसिकदृष्ट्या दुर्बल निघतो.असामान्य असं सौंदर्य सहज प्राप्त्य झालेलं असतानादेखील तो ते सहन करू शकत नाही.ते सौंदर्य त्याला पेलत नाही.लग्नाच्या पहिल्या क्षणापासुन त्या सौंदर्याचा त्याच्यावर इतका विलक्षण पगडा बसतो कि तिच्या सौंदर्या चीच त्याला भीती वाटू लागते  ते सौंदर्य निर्मळ  नाहीच ,एवढी सुंदर  स्त्री पवित्र असूच शकत नाही असे तो मनाने घेतो.पवित्र लक्ष्मीवर संशय घेतो तेव्हा लक्ष्मी तुटून पडते. नववधू म्हणून बाळगलेल्या सगळ्या अपेक्षा मातीमोल होतात.दिग्या एका क्षणी लक्ष्मीवर बलात्कार करतो व भ्रमिष्टासारखा निघून जातो.तीच आणि तेवढीच तिला लाभलेली पुरुषाची संगत. दिगंबर मग जाईकडे जातो पण तिथेदेखील तो टिकू शकत नाही.जाई हि भाविनीची मुलगी पण दिगम्बरवर जीवापाड प्रेम करणारी.पण दुर्बल मनोवृत्तीमुळे दिगंबर दूर निघून जातो .जाताना जेव्हा लक्ष्मी पोटुशी असते तेवा ते मुल आपल नव्हे ते पाप आहे असे तो दास्याला सांगतो.
      दास्या हा दुर्बल मनोवृत्तीचा कहर दाखवलेला आहे त्याला स्वतःला काही निर्णय घेत येत नाहीत त्यासाठी त्याला अच्युत ची मदत लागते.अच्युत हा त्याचा जिवाभावाचा मित्र.लक्ष्मीचं सौंदर्य सगळ्यांना तिच्याकडे आकर्षित करते ह्यातून दास्याही सुटू शकत नाही अन अच्युतही.दास्याच्या लक्ष्मीच्या साडीकडे पाहत राहण्याचा आणि ती हातात घेण्याचा प्रसंग खानोलकरांनी जबरदस्त लिहिलाय.अशा परिस्थितीत लक्ष्मी एकटी पडते व खिडकीतून पाहण्र्या केमळेकर वकिलांच्या घरात आश्रयाला जाते.पण तिथेदेखील तिच्या पदरी एकटच राहाण येत.केमळेकराना पण ते सौंदर्य झेपत नाही.केवळ पाहण्यापलीकडे ते काही करू शकत नाहीत .ते तिच्यासाठी दास्याच्या घरासमोर तिला घर बांधून देतात पण सहज साध्य  असताना देखील लक्ष्मीच्या दैवी सौंदर्याला स्पर्श करायला ते धजावत नाहीत.केमळेकरांच्या  सांगण्यावरून लक्ष्मीला वाणसामान पुरवणारा दाजी देखील तिच्याकडे आकर्षित होतो पण तोदेखील तिच्या शापित सौंदर्याला स्पर्श करण्याचे धाडस दाखवत नाही.लक्ष्मी सर्वस्व अर्पण करायला तयार असूनही दाजी लटका पडतो.ते अनिवार सौंदर्य त्याला विजेसारखा वाटत ते सहन करण्याची त्याची ताकद नसते तो वर्षानु वर्ष लक्ष्मीकडे येतो  व बसून निघून जातो.
                             लक्ष्मीचं पात्र म्हणजे विलक्षण गुंतागुंत आहे. तरुणी,नववधु,कुठलाच भावनिक आधार नसलेली पोटुशी स्त्री,शरीर सुखापासून वंचित राहिलेली स्त्री ,एवढ्या सगळ्यात ती व्यभिचारी आहे असा तिच्यावर लागलेला ठपका हे सगळा भोगत असलेल शापित अलौकिक सौंदर्य असलेल कोवळ तरुण शरीर.केवळ अशक्य आहे  हि कथा वाचण  म्हणजे. तिच्या मानसिक हिंदोळ्यांवर आपण स्वार होऊन तिच्या दुखात सामील होतो.त्यातून प्रत्येक वेळी निर्मल असूनदेखील चवचाल म्हणूनच तिची गावभर चर्चा होते ते दुखः तर ती कुणालाही सांगू शकत नाही तिचा स्वतःचा मुलगा देखील तिची हेटाळणी करतो.ह्या सगळ्यात मध्ये अनेक पात्र आली आहेत.
दास्याचा लक्ष्मीच्या सौंदर्यावर
वेडा झालेला वामन ,दाजी ची मुलगी सुमन,लक्ष्मी चा मुलगा सदा,नदीकाठी सापडलेली बेवारस बकुळ  ह्यांना घेऊन कथा पुढे सरकत राहते.कथा प्रत्यक्ष  वाचायलाच हवी तरच चिं त्र्यं च्या लेखनाची जादू अनुभवता  येईल.कादंबरी थोडी अपूर्ण वाटते.काही पात्रे अचानक समोर येतात.मला तितकीशी नाही आवडली.दुखी शेवट असल्यामुळे असेल कदाचित पण नाही ते एकच कारण नाही.दुखः सारी कथा व्यापून राहत ते काही कुठल्या एका भागासाठी नाही येत.कादंबरी वाचताना आपण सुन्न होऊन जातो.तितकीशी न आवडण्याचं कारण हे देखील असेल कि एखाद सौंदर्य एवढं अलौकिक असू शकत कि ते अप्राप्य वाटावं ??मला नाही पटत.एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत शक्य आहे पण कथेत येणार प्रत्येक पुरुष लक्ष्मीच्या सौंदर्याच्या तेजाने झाकोळला जावा व तिला स्पर्श देखील न करता (जेव्हा  कि ती साध्य आहे तेव्हा) तिचीच साधना करीत राहावा हे अशक्य वाटते .लक्ष्मी अशी रंगवली आहे कि कधी ती नायिका होते  कधी खलनायिका, कधी दैवी वाटते तर कधी शापित ,कधी प्रेमळ वाटते तर कधी कपटी तिची अनेकविध रूपे लेखकांनी लीलया रंगवली आहेत.
 कादंबरी एकदा तरी वाचावी.एकदा वाचून समजतही  नाही आणि झेपतही नाही इतका तिचा आवाका प्रचंड आहे.
विष्णुदास नाम्याच्या गवळणी वरून कादंबरीचे नाव घेतले असले तरी लेखकांनी लेखणीने काळोख भरून टाकलाय अक्ख्या पुस्तकात.त्यासाठी लेखकाला,त्याच्या  शैलीला  सलाम.
गवळण :  रात्र काळी ,घागर काळी,यमुना जळे ती काळी हो माय !
                 बुंथ काळी,बिलवर काळे ,गळामोती ऐकावळी  काळी हो माय

Friday, 1 March 2013

वाटा आडवाटा -- वामन होवाळ (vaata aadvata -vaman hoval)

     
पुस्तकाचे नाव: वाटा आडवाटा        लेखक: वामन होवाळ        रिया पब्लिकेशन         पाने:१४४           किंमत:१४०

ह्या लघुकथा संग्रहात लेखकाच्या दहा कथांचा समावेश आहे.सर्व कथा ८६-८७ सालांमध्ये वेगवेगळ्या दिवाळी अंकांमध्ये (कामगार,आकंठ ,व्यासपीठ,रसस्वाद ई )प्रसिद्ध झालेल्या आहेत.प्रथम पुस्तकाचे मुखपृष्ट पाहून कुठल्यातरी भ्रमणकथा असतील असे वाटलेले पण तसे नाहीये.कथा वेगवेगळ्या बाजाच्या ,वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत.
   काही कथा अगदीच साध्या आहेत,काही मात्र छान आहेत .मलातरी पाटीलकी,ढवाळ ,नवी वाट ह्या कथा आवडल्या.वाटा  आडवाटा तर अजिबात आवडली नाही ,कथा जाम  फसलेली आहे.एकूण लेखन /पुस्तक  ठीक आहे पण  बऱ्याच ठिकाणी  लेखनात बौद्ध समाजाचा ,त्यातील लोकांचा उल्लेख , बाबा साहेबांचा उल्लेख आहे, तो खरच अनावश्यक वाटतो काही ठिकाणी ठीक आहे ,संदर्भ म्हणून चपलख बसतो पण त्या गोष्टीची लेखकाने पुनरावृत्ती केलेली आहे बरयाच  ठिकाणी जी कि  नसती तरीही  कथा वेगळी झाली नसती.
प्रशांत पं. मयेकर १मार्च १३_२१.१५

प्रिय जी. ए.--सुनीता देशपांडे (priya G A-sunita deshpande)

 पुस्तकाचे नाव: प्रिय जी. ए.      लेखिका: सुनीता देशपांडे       मौज प्रकाशन     कि:२००      पाने:१८८
               
                       प्रिय जी ए म्हणजे लेखिकेने प्रसिद्ध लेखक जी ए कुलकर्णींशी पत्रलेखनातून केलेला संवाद.थोडक्यात ह्या पुस्तकात लेखिकेने जी ए'ना लिहिलेली पत्रे आहेत.पत्रे फक्त सुनिता  ताईनीच लिहिलेली असल्यामुळे व त्यांना आलेली उत्तरे ह्या पुस्तकात समाविष्ट नसल्यामुळे काहीस अपूरं  राहिल्यासारखं  वाटतं  पण त्यांची लेखनशैली,एकूण विचार,मते,जी एं च्या आदल्या पत्रातील संदर्भ ह्यामुळे तितकाही काही मोठा अडथळा  वाचताना जाणवत नाही.
                साधारण ८५ सालापर्यंत चाललेला हा पत्र सोहळा कालांतराने पुस्तकरूपाने आला.सुनिता ताइंचे  जी ए हे आवडते लेखक ,पु लं बाहेरगावी गेल्यामुळे लेखिकेने त्यांना पत्रोत्तर केले व हि श्रुखला चालूच राहिली.जी ए व लेखिका यामध्ये परिपक्व ,जिव्हाळ्याची ,वैचारिक देवनघेवनिचि ,मत-मतातरांची ,आपुलकीची मैत्री दिसून येते.पुस्तक वाचताना  वाचकासाठी लेखिका केवळ पु ल च्या पत्नी राहत नाहीत तर  स्वतंत्र,प्रगल्भ व्यक्तिमत्व म्हणून समोर येतात.त्यांचे विचार,लिहिण्याची पद्धत ,एकूण विचारसरणी वाचकाला खिळवून ठेवते व त्यांच्याबद्दल मनात आदर निर्माण होतो.
  जी ए म्हणजे कोशात राहिलेले लोकांचे आवडते व्यक्तिमत्व.त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला त्यांचा प्रत्येक वेडा वाचक अगदी उत्सुक असतो. ह्या पत्रांमधून देखील काही प्रमाणात जी ए समजतात.काही बाबतीतील त्यांची मते समजतात.आजकाल पत्र लिहिण  तसं काल बाह्यच झालंय पण हि अतिशय सुरेख पत्रं वाचली कि त्यातील गोडवा जाणवतो.आपण काय चुकवतोय  ते देखील जाणवतं .असो हे थोड विषयांतर झालं पण पुस्तक सुरेख आहे.एकदा तरी  नक्की वाचण्या सारखे.
  दोन प्रगल्भ व्यक्तींमधल्या विचारांची देवाणघेवाण हि सहसा शब्दरूपात अनुभवायला मिळत नाही.पत्रे जुनी असली तरी काळाच्या बंधनात अडकणारी नव्हेत.
--- प्रशांत मयेकर १ मार्च २०१३_ २०.३५