Sunday 28 April 2013


"हा महाराष्ट्र-पुरुष अति प्राचिन आहे. कधी दक्षिणापथ, दक्षिणखंड, 'म्हराष्ट्र' देश, दंडकारण्य अशा अनेक नावांनी व साजांनी ओळखला जाणारा.
अशा या वॄद्ध महाराष्ट्र-पुरुषाचे हे अस्फुट स्तोत्र आहे, हे रचण्यांतला हेतु काय ?
एवढाच की तो महाराष्ट्र-पुरुष दॄष्टीसमोर उभा ठाकावा, त्याचं झांवळें झांवळें दर्शन घडावं, परिचितांना पुनर्प्रत्ययाच्या लाभ व्हावा, जाणत्यांना खुण पटावी, अबोधांना बोध व्हावा व त्यांचे बाहु फुरफुरावेत.
आम्ही महाराष्ट्रिक कसें ? आमचे वैभव काय ? आमची महत्ता कशी ? आमचे गुण-दोष काय ? ह्या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळावीत हाच या स्तोत्र-रचनेचा हेतु आहे.
महाराष्ट्राचा प्रत्येक धोंडा एकेका रोमहर्षक प्रसंगाचा साक्षी. त्याला जर कधी काळीं जिभा फुटल्या तर तो जे जे सांगेन ते ऐकुन प्रेते उठतील, कबंधे जिवंत होतील, षंढांच्याही अंगी वारे भरेल !
स्वातंत्रप्रियता ही तर महाराष्ट्राची अंगिक प्रवृत्ती.
इंग्रजांना संपुर्ण भारत जिंकण्यापुर्वी शेवटची लढाई इथल्याच ठेंगण्या, काळसर मावळ्यांशी खेळावी लागली. ती युद्धश्री, ती रग, तो आवेश अजुनही मावळला नाही, कधी मावळेल असे दिसतही नाही. हा गुण डोंगरावरुन वहात येणार्‍या भन्नाट वार्‍याचा आहे. कृष्णा, कोयना, पवना, भीमेच्या पाण्याचा आहे.
महाराष्ट्र श्रीमंत आहे, स्वाभिमानी तर आहेच आहे, कणखर आहे, चिवट आहे. मोडेल पण वाकणार नाही, मित्रांसाठी जीव देणारा आहे, भक्तिभावाने गहिवरणारा आहे, लढताना प्राण तळहाताशी घेणारा आहे, थोडासा भांडखोरही आहे आन थोडीशी हिरवटपणाची झाकही आहे. पण किती ? अहो चंद्रावरल्या डागाएवढी हो !
ज्याने महाराष्ट्रावर लोभ केला त्याच्या पायतळी आपला जीव अंथरण्यापुरता भोळा हा महाराष्ट्र आहे, आतिथ्यशील आहे.
किंअभुना तो आहे त्या गिरिशिखरावरील दैवतासारखा, शंभुमहादेवासारखा !
संतापला तर तिभुवने पेटवील आणि संतुष्ट झाला तर कारुण्याची गंगा वाहवील ...
त्या महाराष्ट्राचे हे दर्शन ... !!! "

No comments:

Post a Comment