Monday 25 March 2013

शुभ्र काही जीवघेणे-अंबरीश मिश्र (shubra kahi jeevghene-ambarish mishr)

पुस्तकाचे   नाव: शुभ्र काही जीवघेणे       लेखक:अंबरीश मिश्र      राजहंस प्रकाशन    पाने:१५७       किंमत:१४०
 
                     पुस्तकाच्या मलपृष्ठावरील लिहिलेला संदर्भ अतिशय समर्पक शब्दात पुस्तकाबद्दल मत मांडतो.त्यात लेखक म्हणतो: कलेचा प्रवास धुंद करणारा असतो .यश,कीर्ती,मान -सन्मान हि या प्रवासातील रमणीय विश्राम् स्थळे असतील.परंतु प्रतिभेचा धूप जाळणारे मनस्वी कलावंत जीवनार्थाच मंथन करण्यातच  मग्न असतात "शुभ्र काही जीवघेणे" शोधत असतात.आपल्या प्रासादिक कलागुणांनी साहित्य,नाट्य,संगीत अन सिनेमाचा परिसर उजळून काढणारी सात कलंदर व्यक्तिमत्व या पुस्तकाला रेलून उभी आहेत.
         सात मनस्वी कलाकारांच्या जीवन कहाण्या आणि त्यांच्या प्रतिभा प्रवासाचा वृत्तांत या पुस्तकात चिरेबंद आहे .यातले शुभ्र काही जीवघेणे जे जे आहे ते या कलावंतांचे आहे,जे नकोसे वाटेल त्याला मी कारणीभूत आहे असं लेखक नम्रतापूर्वक लिहितो.
    चन्द्रदेवतेच गाणं हा शोभा गुर्टू वरील लेख आहे,अख्तरीबाई हा बेगम अख्तर यांच्या वरील लेख,चंद्रग्रहण हा सादत हसन मंटो  वरील लेख,ओ पी नय्यर ,पार्श्व नाथ आळतेकर ,
,सज्जाद  हुसैन,पंकज मलिक  हि इतर मंडळी.पुस्तकात प्रत्येकाची छान माहिती लेखकाने दिलीये.पुस्तक मस्त आहे . मुळता  सगळे लेख दिवाळी अंकामधून प्रसिद्ध झालेले आहेत व नंतर पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेले आहेत.पुस्तकामुळे  अनेक चांगल्या गुणी कलावंतांची,त्यांच्या आयुष्याची  आपल्याला ओळख होते.

Thursday 21 March 2013

मुंबईचे वर्णन --गोविंद नारायण माडगावकर (mumbaiche varnan-govind narayan madgaonkar)

पुस्तकाचे नाव:मुंबईचे वर्णन          गोविंद नारायण माडगावकर      समन्वय प्रकाशन                             पाने ३६०        किंमत:३५०

                            हे पुस्तक प्रथम १८६३ मध्ये प्रसिद्ध झाले .त्यानंतर जवळ जवळ १०० वर्षे ते दुर्लक्षित राहिले त्यानंतर २००१ साली ते पुनर्मुद्रित करण्यात आलेले आहे.न रा फाटकांनी प्रस्तावनेत लिहिलेय कि १८६३ मध्ये मुंबईची जी स्तिथी होती तिचे समग्र व सम्यक  दर्शन पुढच्या पिढीला घडावे अशी माडगावंकरांची आकांक्षा ह्या पुस्तकात सफल झालेली आहे.त्यांचे पुस्तकात तेव्हाच्या नागरिक जीवनाची बहुतेक सर्व अंगोपांगे आलेली आहेत.मुंबई ह्या नामांकित व वैभवाच्या शिखरावर चढलेल्या शहराचा साध्यंत वृतांत त्यांनी ह्या पुस्तकात  लिहिला आहे.
पुस्तकात एकूण १५ प्रकरणे  आहेत.त्यामध्ये  मग शहराची रचना,भाषा ,नामांकित स्थळे ,इंग्रजांची राजसत्ता ,मुळच्या स्थायिक लोकांची   माहिती,देवालायांची माहिती,रोगराई व तिची कारणे ,त्यावेळची शहराची रचना व माहिती (भायखळे ,माजगाव ,आर्थर बंदर,पोलोबंदर ,वाडिया बन्दर ,वरळी ,म्हातार पाखाडी,वालुकेश्वर ),आरमार,लष्कराची माहिती,लोकसंख्या,दुष्काळ व त्याचे निवारण,पारशी ,मुसलमान लोकांचे दंगे व त्यांचे निराकरण ,शहराचे उत्पन्न,नवे कर व त्यांची करणे,कोर्ट व न्यायव्यवस्था ,दवाखाने,पुस्तकालये,वेगवेगळे कारखाने व उद्योग धंद्यांची माहिती ई. काय काय लिहीलीले आहे.एकुणात त्यावेळच्या एकूण समाजव्यवस्थेच प्रतिबिंब त्यांच्या लेखनातून दिसून येतं .इंग्रजांची व्यवहार कुशलता,राज्य करण्याची पद्धती ह्यावर लेखकाने खूपच positively लिहिलेले आहे. ते लेखनासाठी त्यावेळच्या उपलब्ध साधनाचा,बखरीचा  व स्वताच्या सुक्ष्म अवलोकनाचा वापर त्यांनी केलाय.छोटे मोठे किस्से ,वर्णने सांगून त्यावेळचे चित्रच डोळ्यासमोर उभे केलेले आहे .जुन्या मुंबईचा अभ्यास करताना हे पुस्तक म्हणजे मैलाचा दगडच आहे असे जरूर सांगावेसे वाटते.वेळोवेळी दाखले म्हणून उदाहरणे,बखरीतील उतारे,जुन्या जाणत्यांची मते,श्लोक,अभंग,कवने,लोकाच्या त्यावेळच्या खोट्या भ्रामक समजुती ई सारे पानोपानी दिलेले आहे.
     पुस्तक नक्कीच वाचण्यासारखे आहे.बरीच माहिती जी आपणाला किवा आपल्या वाड  वडिलांना देखील माहिती नाही ती यायोगे आपल्याला वाचायला मिळते.पुस्तकातील काही वाक्ये येथे देत आहे तेणेकरून वाचकांना अंधुकशी कल्पना येईल कि पुस्तकात काय आहे ते.
माहीम आणि मुंबई वेगवेगळी बेटे होती
मुंबईची चार पाच सुट्टी बेटे होती-कुलाबा,महालक्ष्मी,वरळी,माजगाव,शिव

महालक्ष्मीस जाण्यास पूर्वी होडी लागत असे ती आजच्या कामाठीपुरातून जात असे

मुंबईत पूर्वी लुटारू लोकांचे भय असल्यामुळे जेव्हा इंग्रज प्रथम इथे आले तेव्हे त्यांनी रात्रीचे आठ वाजले म्हणजे तोफ मारावी आणि लोकास बाहेर न पडण्याची इशारत करावी आणि पहाटेच्या पाच कळकाच्या घंटा  वाजल्या आणि अरुणोदय झाला कि फिरून तोफ मारून लोकांस बाहेर फिरायची मोकळीक आहे अशी सूचना द्यावी अशी वहिवाट घातली होती.

त्यावेळी शेतास व माडास  मासळीचे खत घालीत त्यामुळे शेतातून व बागातून दुर्गंधी सुटे व लोकास उपद्रव होई १७२० मध्ये सरकारने त्यास मनाई केली.

१६९९ मधील एका पत्रात गवर्नर लिहितो,एथील लोक पादचारी आहेत,बसाय्जोगा मुंबईत एकच घोडा असून गाडीस जुम्पायाजोगी बैलांची एक जोडी आहे .

कुलाबा हे मुंबईच्या दक्षिणेच्या शेवटास लहानसे ओसाड बेत असून ढोरे चरण्याचे ठिकाण होते.

शिवचा पूल १७९७त बांधला त्यास ५०५७५ रुपये खर्च झाला हे द्रव्य रयतेकडून उत्पन्न करून घेण्यासाठी अशी युक्ती काढली कि या पुलावरून गाड्या घोडे पालक्या जातील येतील त्यांजकडून याप्रमाणे कर घ्यावा --बैलाच्या गाडीस अर्धा आणा,घोड्यास चार आणे,एका घोड्याच्या गाडीस अर्धा रुपया ,आणि दोन घोड्यांच्या गाडीस एक रुपया याप्रमाणे कर द्यावा .कालांतराने जे द्रव्य हा पूल बांधावयास खर्च पडले ते भरपाई होऊन चुकले तेव्हा लागलेच कर घेणे बंद झाले.

लोहार लोकांचे कारखाने व लोखंडी समान विक्नार्यान्ही दुकाने आहेत म्हणून त्याला लोहार चाळ म्हणतात 

कोणास मोठे शासन करायांचे असल्यास शहरांत दवंडी पिटवून त्यास तरीपार करीत म्हणजे त्याला पनवेल ,अलिबाग,उरण एथे नेउन सोडीत आणि त्याला शहरात येण्याचा प्रतिबंध करीत.हे त्यावेळचे काळेपाणी!

आजची बदलती चाळीशी--डॉ लिली जोशी (aajachi badalati chalishi-dr lili joshi)

पुस्तकाचे नाव:आजची बदलती चाळीशी    लेखिका :डॉ लिली जोशी       पद्मगंधा  प्रकाशन   पाने :२६०   किंमत:१५०
      
"आजची बदलती चाळीशी "हा लेख नोव्हेंबर १९९७ साली प्रथम साप्ताहिक सकाळ मध्ये प्रसिद्ध झाला .अनेक वाचकांनी या विषयावर पुस्तक लिहावे असे सुचवले.
  त्यांच्याकडे उपचारासाठी येणारे रुग्ण आणि अन्य परिचित यांच्याकडून त्यांनी एक समग्र प्रश्नावली भरून घेतली.त्यानुसार काही आखाडे ,अंदाज ,अनुमान आणि निष्कर्ष काढले .यामधून प्रस्तुत पुस्तक साकार झाले आहे.
    डॉ लिली  जोशी यांनी चाळीशी आणि नंतरच्या एकूणच जीवनप्रणाली विषयी त्याचप्रमाणे आहारशास्त्र ,व्यायामशास्त्र ,कामजीवन ,मृत्यू संकल्पना आणि अर्थकारण यांचाही विचार ह्या पुस्तकात केला आहे.चाळीशी हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे.त्यानंतर आयुष्यात एक वेगळे वळण घ्यायचे असते ते कसे?हे समजावून घेण्यासाठी प्रस्तुत पुस्तक मार्गदर्शन करेल.
गेस्ट आर्टिकल  by :पंकज व. महाजन. २०/३/१३

Friday 15 March 2013

दुर्गदर्शन-- गो नी दांडेकर(durgadarshan go ni dandekar )

पुस्तकाचे नाव: दुर्गदर्शन              लेखक: गो नी दांडेकर           मृण्मयी प्रकाशन               पाने:१८४


दुर्गदर्शन हे गो नि दांच दुर्गभ्रमंती च्या निमित्ताने केलेलं ललीतम्य लेखन .दुर्गांवर त्याचं निरतिशय प्रेम होतं.दुर्गभ्रमण करताना इतिहासाचे साक्षीदार असणारे दुर्ग त्यांच्या मनात इतिहास काळातलं विश्व उभ करीत.तिथले भग्नावशेष         गोनिदांशी बोलू लागत .दुर्गांवरच्या निसर्गाचे अनेकानेक विभ्रम त्यांना मोहवित अन त्यांच भावविश्व संपन्न होई त्यातूनच हे लेखन झालं .दुर्गावर जाणारया अन जाणाऱ्या असंख्यांना दुर्गांकडे पहायची नवी दृष्टी दिली ---प्रस्तावनेत वीणा ,विजय देव
कुणास काय आवडते कुणास काय?तर मग मला जर किल्ले पाहत भटकणे आवडले ,तर त्याबद्दल कुणाच्या मनी खंत उपजू नये .किंबहुना किल्ले पाहणे,चान्दिण्यानी भरल्या त्यांच्यावरल्या रात्री स्वच्छदाने भोगणे,हे मला जडलेले व्यसन आहे.
   प्रस्तावनेत गो नि दानी  हे देखील लिहिलेय कि दुर्गदर्शन हे लहानगे पुस्तक मी केलेल्या दुर्ग भ्रमनातील काही दिवसांची दैनंदिनी आहे .या दैनंदिनीत अमुक किल्ला अमुक गावापासून इतके मैल ,अशी तपशील सांगणारी माहिती नोंदवलेली नाही.एका मनस्वी परीभ्रामकाच्या मनावर उठलेली प्रतिबिंबे या पुस्तकात आढळतील .मी आणि माझ्या मित्रांनी उन्हापावसाचे घाव कसे सोसले,याच्या क्वचित कधी केलेल्या नोंदी यात सापडतील.
   काही थोडे अदभुत जगता यावे काही थोडे साहस .एखादा कडा -फार मोठा नको -चढता यावा .एखाद्या अवघड वाटेने उतरता यावे.कुठे खरचटावे .कुठे ठेच लागावी.कुठे पाय मुरगळावा .कुठे घामाघूम व्हावे .कधी कडाडून तहान लागावी.कधी अपरंपार भूक लागावी.कुठे टळटळीत उन्हात भटकायला मिळावे. भणाभणा   वर अंगावर घेता  यावा .कधी काकडत्या थंडीत राने  पार करावी लागावीत.असे थोडे बेबंद जीवन.थोडे धोकेबाज.म्हणजे मग जगणे सुगंधी होते,त्याला एक निर्भयपण लागते.--दुर्गदर्शन
घरचे भाडे दहा रुपये महिना देतो .भिंतीना चिरा  पडल्या आहेत.कुटुंब सारखे ओरडत असते तेल संपले,गहू आणायला हवेत,तुमची धोतरे   फाटली.माझ्या कानी  आक्रोशच शिरत नाही.हि धरीत्रीमोलाची दोन लेणी माझ्या घरी आहेत.आता माझ्या एवढा येशवंत आणि धनवंत मला दुसरा कुणी दिसतच नाही  ---पाचाडला तुकनाना शेड्ग्यांकडे मिळालेली जिजाउंच्या देवघरातील व्यन्कटेशाची मूर्ती व शिवाजी महाराजांच्या पावलाचे ठसे घेतले त्या कथेच्या शेवटी गो नि दांचे उद्गार .
    पुस्तकात खूप छान छान वर्णनं   वाचायला  मिळतात मग ते दहा दिवसात दहा दुर्ग असो कि भर उन्हात सिद्धगड चढण्याची गोष्ट ,हरिश्चंद्रगड ,पन्हाळा ते खेळना.सगळ्या कथा रोमहर्षक आहेत. खऱ्या सह्यप्रेमीने वाचल्याच पाहिजेत.

Friday 8 March 2013

रात्र काळी... घागर काळी--चिं त्र्यं खानोलकर (ratara kali ghagar kali -c t khanolkar)

पुस्तकाचे नाव: रात्र काळी... घागर काळी             लेखक: चिं त्र्यं खानोलकर      मौज प्रकाशन      पाने २०३
                         

                   पुस्तकाबद्दल, लेखकाबद्दल बरच ऐकून होतो शेवटी एकदाचे रात्र काळी हाती लागले.एका बैठकीत मात्र नाही संपवता आले.त्यातील लिखाण,भाषा,कथा,पात्र सगळ अंगावर आलं.एखादा मानुस  एवढ दुखी जीवन कसा रेखाटू शकतो ह्यावर विश्वास नाही बसत.लेखन भयकथा नसले  तरी गुढतेकडे वळणारे आहे.नाही नाही हि गुढकथा नाही पण चिं त्र्यं च्या लेखनात असा काही  बाज आहे कि त्या अंधाऱ्या काळोखात आपल्याला सोडून देतात आणि आपण भटकत बसतो त्यातील पात्रांबरोबर त्यांची सूख दुःखं झेलत! भाषा शैली तर इतकी वेगळी कि प्रतीकात्मकता अशी पण असू शकते ह्यावर आपण दिग्मूढ होऊन  जातो .  
              अलौकिक सौंदर्य लाभलेली यज्ञेश्वर बाबाची कन्या लक्षी हि कथेची मुळ. नायिका नाही म्हणू शकत पण तिच्याभोवती कथा फिरत राहते.मंदिरात खड्या आवाजात रौद्र म्हणणाऱ्या दिगम्बराच्या आवाजावर भाळुन यज्ञेश्वर बाबा लक्ष्मी चे लग्न दिगंबर बरोबर करायचे ठरवतात व त्याच्या बापाला दास्याला तसे सांगतात.काहीही ध्यानीमनी नसताना केवळ वडिलांच्या सांगण्यावरून लक्ष्मी दिगम्बराशी  लग्न करते.पण दिगंबर म्हणजे मानसिकदृष्ट्या दुर्बल निघतो.असामान्य असं सौंदर्य सहज प्राप्त्य झालेलं असतानादेखील तो ते सहन करू शकत नाही.ते सौंदर्य त्याला पेलत नाही.लग्नाच्या पहिल्या क्षणापासुन त्या सौंदर्याचा त्याच्यावर इतका विलक्षण पगडा बसतो कि तिच्या सौंदर्या चीच त्याला भीती वाटू लागते  ते सौंदर्य निर्मळ  नाहीच ,एवढी सुंदर  स्त्री पवित्र असूच शकत नाही असे तो मनाने घेतो.पवित्र लक्ष्मीवर संशय घेतो तेव्हा लक्ष्मी तुटून पडते. नववधू म्हणून बाळगलेल्या सगळ्या अपेक्षा मातीमोल होतात.दिग्या एका क्षणी लक्ष्मीवर बलात्कार करतो व भ्रमिष्टासारखा निघून जातो.तीच आणि तेवढीच तिला लाभलेली पुरुषाची संगत. दिगंबर मग जाईकडे जातो पण तिथेदेखील तो टिकू शकत नाही.जाई हि भाविनीची मुलगी पण दिगम्बरवर जीवापाड प्रेम करणारी.पण दुर्बल मनोवृत्तीमुळे दिगंबर दूर निघून जातो .जाताना जेव्हा लक्ष्मी पोटुशी असते तेवा ते मुल आपल नव्हे ते पाप आहे असे तो दास्याला सांगतो.
      दास्या हा दुर्बल मनोवृत्तीचा कहर दाखवलेला आहे त्याला स्वतःला काही निर्णय घेत येत नाहीत त्यासाठी त्याला अच्युत ची मदत लागते.अच्युत हा त्याचा जिवाभावाचा मित्र.लक्ष्मीचं सौंदर्य सगळ्यांना तिच्याकडे आकर्षित करते ह्यातून दास्याही सुटू शकत नाही अन अच्युतही.दास्याच्या लक्ष्मीच्या साडीकडे पाहत राहण्याचा आणि ती हातात घेण्याचा प्रसंग खानोलकरांनी जबरदस्त लिहिलाय.अशा परिस्थितीत लक्ष्मी एकटी पडते व खिडकीतून पाहण्र्या केमळेकर वकिलांच्या घरात आश्रयाला जाते.पण तिथेदेखील तिच्या पदरी एकटच राहाण येत.केमळेकराना पण ते सौंदर्य झेपत नाही.केवळ पाहण्यापलीकडे ते काही करू शकत नाहीत .ते तिच्यासाठी दास्याच्या घरासमोर तिला घर बांधून देतात पण सहज साध्य  असताना देखील लक्ष्मीच्या दैवी सौंदर्याला स्पर्श करायला ते धजावत नाहीत.केमळेकरांच्या  सांगण्यावरून लक्ष्मीला वाणसामान पुरवणारा दाजी देखील तिच्याकडे आकर्षित होतो पण तोदेखील तिच्या शापित सौंदर्याला स्पर्श करण्याचे धाडस दाखवत नाही.लक्ष्मी सर्वस्व अर्पण करायला तयार असूनही दाजी लटका पडतो.ते अनिवार सौंदर्य त्याला विजेसारखा वाटत ते सहन करण्याची त्याची ताकद नसते तो वर्षानु वर्ष लक्ष्मीकडे येतो  व बसून निघून जातो.
                             लक्ष्मीचं पात्र म्हणजे विलक्षण गुंतागुंत आहे. तरुणी,नववधु,कुठलाच भावनिक आधार नसलेली पोटुशी स्त्री,शरीर सुखापासून वंचित राहिलेली स्त्री ,एवढ्या सगळ्यात ती व्यभिचारी आहे असा तिच्यावर लागलेला ठपका हे सगळा भोगत असलेल शापित अलौकिक सौंदर्य असलेल कोवळ तरुण शरीर.केवळ अशक्य आहे  हि कथा वाचण  म्हणजे. तिच्या मानसिक हिंदोळ्यांवर आपण स्वार होऊन तिच्या दुखात सामील होतो.त्यातून प्रत्येक वेळी निर्मल असूनदेखील चवचाल म्हणूनच तिची गावभर चर्चा होते ते दुखः तर ती कुणालाही सांगू शकत नाही तिचा स्वतःचा मुलगा देखील तिची हेटाळणी करतो.ह्या सगळ्यात मध्ये अनेक पात्र आली आहेत.
दास्याचा लक्ष्मीच्या सौंदर्यावर
वेडा झालेला वामन ,दाजी ची मुलगी सुमन,लक्ष्मी चा मुलगा सदा,नदीकाठी सापडलेली बेवारस बकुळ  ह्यांना घेऊन कथा पुढे सरकत राहते.कथा प्रत्यक्ष  वाचायलाच हवी तरच चिं त्र्यं च्या लेखनाची जादू अनुभवता  येईल.कादंबरी थोडी अपूर्ण वाटते.काही पात्रे अचानक समोर येतात.मला तितकीशी नाही आवडली.दुखी शेवट असल्यामुळे असेल कदाचित पण नाही ते एकच कारण नाही.दुखः सारी कथा व्यापून राहत ते काही कुठल्या एका भागासाठी नाही येत.कादंबरी वाचताना आपण सुन्न होऊन जातो.तितकीशी न आवडण्याचं कारण हे देखील असेल कि एखाद सौंदर्य एवढं अलौकिक असू शकत कि ते अप्राप्य वाटावं ??मला नाही पटत.एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत शक्य आहे पण कथेत येणार प्रत्येक पुरुष लक्ष्मीच्या सौंदर्याच्या तेजाने झाकोळला जावा व तिला स्पर्श देखील न करता (जेव्हा  कि ती साध्य आहे तेव्हा) तिचीच साधना करीत राहावा हे अशक्य वाटते .लक्ष्मी अशी रंगवली आहे कि कधी ती नायिका होते  कधी खलनायिका, कधी दैवी वाटते तर कधी शापित ,कधी प्रेमळ वाटते तर कधी कपटी तिची अनेकविध रूपे लेखकांनी लीलया रंगवली आहेत.
 कादंबरी एकदा तरी वाचावी.एकदा वाचून समजतही  नाही आणि झेपतही नाही इतका तिचा आवाका प्रचंड आहे.
विष्णुदास नाम्याच्या गवळणी वरून कादंबरीचे नाव घेतले असले तरी लेखकांनी लेखणीने काळोख भरून टाकलाय अक्ख्या पुस्तकात.त्यासाठी लेखकाला,त्याच्या  शैलीला  सलाम.
गवळण :  रात्र काळी ,घागर काळी,यमुना जळे ती काळी हो माय !
                 बुंथ काळी,बिलवर काळे ,गळामोती ऐकावळी  काळी हो माय